शाकाहारी साठी ११० रुपये तर मांसाहारीसाठी १८० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
:  कार्यकर्त्यांना  निवडणुकीत भोजन, नाश्ता , चहा देताना  उमेदवारांना वारेमाप खर्च करता येत नाही. कारण निवडणूक आयोगाने जेवणाची थाळी, चहा, पाणी यांचे दर निश्चित केले असून, यापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर  कारवाई होऊ शकते.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला  प्रचारासाठी २८ लाख रुपये खर्च करता येणार असून, ही खर्चमर्यादा पाळली जाते की नाही यावर आयोगाचे लक्ष आहे.
प्रचारावेळी वापरल्या जात असलेल्या प्रत्येक घटकासाठी दरपत्रक निश्चित करण्यात आले असून यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या दरांची पडताळणी करण्यात आली आहे. उमेदवाराने दाखविलेला खर्च आणि प्रत्यक्षात केलेला खर्च याची पडताळणी चित्रीकरण पाहून केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी साधा चहा १० रुपये, तर स्पेशल चहा १५ रुपये दर आहे, तर पाणी बाटली अर्धा लिटर १० रुपये, तर एक लिटरच्या बालटीकरिता २० रुपये दर ठेवण्यात आला आहे. नाष्टा दर पोहे, उप्पीट, शिरा, वडापावसाठी १० रुपये दर निश्चित करण्यात आला असून जेवणासाठी वेगवेगळे दर आहेत. शाकाहारी साधे ८० रुपये तर विशेष थाळीकरिता ११० रुपये दर आहे. मांसाहारीमध्ये चिकनसाठी १२५ रुपये, मच्छीसाठी १५० रुपये, तर मटणाच्या भोजनाकरिता १८० रुपये दर आहे.
याशिवाय प्रचारादरम्यान वापरण्यात येत असलेल्या पुष्पहारासाठी ५६ रुपयांपासून २०० रुपये आणि पुष्पगुच्छासाठी ५० ते २०० रुपये दर आहेत. उमेदवार गावात आल्याचे मतदारांना कळावे आणि वातावरणनिर्मितीसाठी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचाही दर निश्चित करण्यात आला असून एक हजार फटाक्यांच्या माळीचा दर २०० रुपये असेल. उमेदवाराचे चिन्ह असलेल्या टोपीचा दर ९ ते १३ रुपये, तर बिल्ले ७ ते १३ रुपये प्रतिनग आहेत.
दुचाकीचा दर दिवसाचा दर इंधनासह ४०० रुपये प्रतिदिन असून रिक्षाचा दर एक हजार, तर सुमो, बलेरोसाठी २४००, तवेरा गाडीसाठी २६०० असा दर आहे. सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या मदानासाठी दोन रुपये प्रति चौरस फूट असे निश्चित करण्यात आले आहेत.
निवडणुकीत वापरण्यात येत असलेल्या ढोलताशा संघासाठी दिवसाला पाच हजार, लेझीम पथकासाठी २५ हजार, हलगी, घुमकी, कैताळ तीन हजार, झांज पथक २० हजार, बेंजो एक तासासाठी १२ हजार, पोवाडा पथक प्रति प्रयोग पाच हजार, पथनाट्य दिवसाला पाच हजार आणि तुतारी म्हणजेच शिंगवाला प्रति कार्यक्रम एक हजार, तर कलापथकासाठी प्रति कार्यक्रम पाच हजार रुपये मोजले जाणार आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos