महत्वाच्या बातम्या

 ३ मार्च रोजी जिल्हयातील ८५ हजार १८६ बालकांना देणार पल्स पोलिओ लसीचा डोस


- सज्ज व्हा ! दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दर वेळी : जिल्हाधिकारी यांचे आवाहन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३  मार्च, २०२४ रोजी राज्यात राबविण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहे.भारत पोलिओ मुक्त देश आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असुन, जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्याकरीता जिल्हा टास्क फोर्सची सभा २८ मार्च, २०२४ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, समीर कुर्तकोटी यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली.

त्यात जिल्हयातील नागरिकांनी जागृतराहुन आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीचे डोस अवश्य पाजावे असे आवाहन समीर कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.जिल्हास्तरीय टास्कफोर्स समिती सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा माताबाल संगोपण अधिकारी डॉ.मनिषा साकोडे, निवासी वैद्यकिय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ.अमित चुटे, आयएपी चे अध्यक्ष डॉ.अशोक ब्राम्हणकर,  आयएमए चे प्रतिनिधी, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग  तसेच इतर संबंधीत  विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील ८५,१८६ बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येणार आहे. जिल्हयात ग्रामिण भागात ९७४ व शहरी भागात ११३ असे एकुण १ हजार ०८७ लसीकरण केंद्र कार्यरत राहतील, अतिजोखमीच्या क्षेत्रात (झोपडपटी, भटक्या जमाती, बांधकाम क्षेत्र, विटाभट्टी इत्यादी ठिकाणी) ४९  मोबाईल टिम कार्यरत राहतील तसेच रेल्वे स्टेशन, बस स्थानक, यात्रेच्या ठिकाणी ७१ ट्रांन्झींट टिम कार्यरत राहील. पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी, पोलिओ डोस घेण्यापासून असंरक्षीत राहिलेल्या बालकांना  ४, ५ व ६ मार्च पर्यंत ९१४ टिम तीन दिवस ग्रामिण भागातील २ लाख ५८ हजार २७८ घरांना  तर शहरी भागात ४, ५ , ६, ७ व ८ मार्च, पर्यंत ६९ टिम पाच दिवस ४० हजार ६४९ घरांना आयपीपीआय अंतर्गत भेटी देतील. 

तसेच सर्वेक्षणात असंरक्षीत बालकांचा शोध घेवून, बालकांना पोलिओ लसीकरण करुन संरक्षीत करणार आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेकरीता आरोग्य विभागासोबतच महिला बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र विज वितरण कंपनी या विभागाचा सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच मोहिमेकरीता आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस आणि स्वयंसेवक असे मिळून २६३७ कर्मचारी तर २१७ पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असुन, जिल्हास्तरावरुन प्रभावी पर्यवेक्षणाकरीता जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्हयातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे १०० टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण करुन घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos