पुण्यात पावसामुळे हाहाकार, ९ जण मृत्युमुखी


वृत्तसंस्था / पुणे :  बुधवारी रात्री पुण्यात  पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून  पावसाने एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती  पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली गेली. याबाबत रात्री बाराच्या सुमारास लष्कराच्या दक्षिण कमांडला माहिती देण्यात आली. त्यानंतर जवानांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या भागातून ५०० नागरिकांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच्याच सेंट पॅट्रिक चर्च येथे आणण्यात आले . दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले आहे.
पुणे-सातारा मार्गावर वेळू गावच्या हद्दीत पूरसदृष्य स्थिती आहे. तिथे एक ओम्नी कार वाहून गेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दक्षिण पुण्यात जोरदार पावसामुळे कात्रज तलाव भरून आंबिल ओढ्यातून पाण्याचा लोंढा आला. तलावाशेजारील लेक टाउन सोसायटीची भिंत कोसळल्याने इमारतींमध्ये पाणी शिरले. येथून दोन महिला पाण्यात वाहू लागल्या, तेव्हा त्यांना वाचविण्यात आले, तर पद्मावती येथील विवेकानंद पुतळ्याजवळ आंबिल ओढ्याची संरक्षक भिंत कोसळल्याने शेजारील सोसायट्यांमध्ये पाण्याचा लोंढा आला. गुरूराज सोसायटीमध्ये तर दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढल्याने घबराट उडाली. तसेच, तावरे कॉलनी, बागूल उद्यान, लक्ष्मीनगर या भागातही ओढ्याकाठी पाणी वाढू लागले. दांडेकर पूल परिसरातही काठावरच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे पोलिस आणि अग्निशामक दलाने नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले; तसेच राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनीही धाव घेऊन नागरिकांना मदत केली.   
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-26


Related Photos