महत्वाच्या बातम्या

 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मल्टीमीडिया प्रदर्शनी उपयुक्त ठरणार : मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


-  मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजना विविध विभागामार्फत राबविण्यात येतात. शैक्षणिक, घरकुल, शिष्यवृत्ती अशा बऱ्याच योजनांबद्दल नागरिकांना बरेचदा माहिती नसते. या मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळणार असून योजनांचा लाभ घेण्यासाठी ही मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने तीन दिवसीय सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालय परिसरात मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे-राऊत, समाज कल्याण विभागाचे निरीक्षक राजेश नाईक, शदर निबुदे, सुहास लिहितकर, जिल्हा माहिती कार्यालयातील मनोज सोयाम, दिलीप बोंडसे, पंढरीनाथ लुटे तसेच वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

योजनेबद्दलची माहिती, लाभाचे स्वरूप, योजनेचा लाभ मिळविण्याकरिता कोणाशी संपर्क करावयाचा, आवश्यक कादगपत्रे याबद्दलची सविस्तर माहिती या प्रदर्शनीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदर्शनीला नागरिकांनी भेट देऊन इतरांना सुध्दा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बोंडसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज सोयाम यांनी मानले. शासनाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्र प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सदर प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहेत. या प्रदर्शनीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.  





  Print






News - Wardha




Related Photos