आर्थिक मंदीमुळे सोन्यातील गुंतवणुकीत वाढ, दर प्रतितोळा चाळीस हजारांवर जाण्याची शक्यता


वृत्तसंस्था /मुंबई :  जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. परदेशी बँकांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. शनिवारी सोन्याचा दर प्रतितोळा ३९ हजार ६५५ रुपयांवर पोहोचला.  
ऑगस्ट २०१८ मध्ये जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा दर ३२ हजार ५०० रुपये होता. सध्या हा दर ३९ हजार ६५५ रुपये आहे. वर्षभरात दरात सात हजार १५५ रुपयांची वाढ झाली. ही वाढ विक्रमी असल्याने सराफ व्यवसायात कमालीची शांतता आहे. भविष्यात आणखी दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने दागिने मोडण्यासही ग्राहक येत नाहीत. 
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. सोन्याची आयात डॉलरमध्ये होत असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणामही सोने दरावर होत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाल्याने बँका धास्तावल्या आहेत. भविष्यातील धोका ओळखून जागतिक बँकांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. मागणीत वाढ झाल्याने दरात वाढ होत आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच सोन्याच्या आयात शुल्कात तोळ्याला अडीच टक्क्यांची वाढ करून ते साडेबारा टक्के केले. शिवाय तीन टक्के जीएसटी आहेच. यामुळे सोने दरात मोठी वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याचा सध्याचा दर ३४ हजार रुपये आहे. मात्र विविध करांपोटी ग्राहकांना पाच ते साडेपाच हजार रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.    Print


News - Rajy | Posted : 2019-08-25


Related Photos