महत्वाच्या बातम्या

 पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- नागपूर जिल्ह्याला २५० कोटी तर भंडारा जिल्ह्याला १०० कोटी निधी
-  अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण

-  विदर्भातील जल पर्यटनाला नवी दिशा मिळणार
-  अंभोरा केबल-स्टेड पुल म्हणजे स्टेट ऑफ आर्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ३५० कोटीचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत भंडारा जिल्ह्याला १०० कोटी तर नागपूर जिल्ह्याला २५० कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून पर्यटनाचे मोठे सर्किट तयार करून वनपर्यटनासोबतच जल पर्यटन क्षेत्राचा विकास तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करून जलपर्यटनाला नवी दिशा देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण व भंडारा जिल्ह्यातील पहेला-अंभोरा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते.

अंभोरा पुलाच्या मध्यवर्ती भागातून परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पाच नद्यांचा संगम आणि वनक्षेत्र पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरी हे या पुलाचे वैशिष्ट आहे. यामुळे पर्यटकांना सुविधा झाली आहे. पर्यटन हा जगातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग, ही बाब लक्षात घेऊन आंभोरा परिसरात जल पर्यटन विकासाचे काम करण्यात येणार आहे. येथे बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, पाण्यातले साहसी खेळ, हॉटेल व्यवस्था आदी उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

पुर्व विदर्भात वन पर्यटनासोबतच जल पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील, असा शासनाचा प्रयत्न असून जलपर्यटन, जंगल सफारी, ट्रेकींग अशा विविध तयार होणाऱ्या बाबीतून याभागात मोठे परिवर्तन दिसेल, असे ते म्हणाले. व्यापाराची लाईफ लाईन असलेला समृद्धी महामार्ग भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या पूर्व विदर्भात वाढविण्यात येणार आहे त्याचा लाभ ही येथील पर्यटन व उद्योग व्यवसायांना होईल. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार असून गोसेखुर्द प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी सहाशे किलोमीटर कॅनल द्वारे नागपूर-वर्धा-यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून संपूर्ण विदर्भात सिंचनाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. एकूण ८८ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की अंभोरा केबल-स्टेड पुल म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रकल्पाचे उत्तम उदाहरण असून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि वैशिष्ट्यांचा समावेश असलेला हा अत्याधूनिक पूल आहे. याठिकाणी नागपूरच्या फुटाळा-शो प्रमाणे लाईट व साऊंड शो लवकरच सुरू करण्यात येणार आहे यात अे.आर. रहेमान यांचे संगीत घेतले आहे. हा पूल व शो बघण्यासाठी जगातील पर्यटक येथे येतील. अंभोरा परिसरात पर्यटनातून रोजगार उपलब्ध होण्याची सुरूवात या पुलामुळे झाली असल्याचे ते म्हणाले. पूर्वी या भागातील लोकांना भंडारा जाण्यासाठी ६० किलोमीटरचा फेरा पडत होता आता पुलामुळे भंडाऱ्याचे अंतर केवळ २० किलोमीटरवर आले आहे. या पुलामुळे येथील वाहतुकीची समस्या सुटेल व दळणवळाणाचा खर्च देखील कमी होईल. गोसेखुर्द जल पर्यटनाचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यात येईल पर्यटनातून येथील स्थानीकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही गडकरी यांनी सांगितले. 

यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार राजू परवे यांनीही मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एकमेव केबल स्टेड पूल असलेल्या अंभोरा पुलाची लांबी ७०५.२० मीटर असून या प्रकल्पाचे एकूण किंमत १७८ कोटी रुपये इतकी आहे. पुलाच्या मध्यभागी ४० मीटर उंचीवर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली यात एकावेळी दिडशे लोक बसू शकतात, अशी व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यातील पहेला-अंभोरा हा रस्ता ७.६० किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पासाठी २४.९०  कोटीची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos