महत्वाच्या बातम्या

 ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : ०१ फेब्रुवारीला होणार बजेट सादर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

संसदेचेअर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

३१ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार या अंतरिम बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठ्या घोषणा करू शकते, असा कयास बांधला जात आहे. तसेच अंतरिम अर्थसंकल्पात महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असेल.

संसदेचे हिवाळी अधिवेशन गेल्या वर्षी ४ डिसेंबरपासून सुरू झाले होते, जे नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संपले. संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसून काही जणांनी गोंधळ घातला. संसद सुरक्षेच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. यामुळे विरोधी पक्षातील शेकडो सदस्यांना राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना संसदेत निवेदन देण्याची मागणी विरोधकांनी केली होती. या मागणीवर विरोधक ठाम राहिले. विरोधकांनी संसद संकुलातील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. यादरम्यान तृणमूलच्या एका खासदाराने राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली, त्यानंतर बराच गदारोळ झाला. तसेच तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांना कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अपात्र ठरवण्यात आले.





  Print






News - World




Related Photos