महत्वाच्या बातम्या

 संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे निधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे आज बुधवार १० जानेवारी ला निधन झाले. दीर्घकाळ कर्करोगाशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. कोलकाता येथील रुग्णालयात वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तराना उस्ताद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राशीद यांनी आपल्या मखमली आवाजाने अनेक मैफिली गाजवल्या. रामपूर- सहसवान घराण्याचा ते भक्कम आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातून शोक व्यक्त होत आहे. राशिद खान पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्यानंतर उस्ताद राशिद खान यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांनी सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. राशिद खान यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला. मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान हे आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत जगताचे हे मोठे नुकसान आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

वयाच्या ११ व्या वर्षी पहिले गाणे -

राशिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बदायूँ इथला. ते उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान (१९०९-१९९३) यांच्याकडून घेतले. राशिद हे उस्ताद रामपूर- सहसवान घराण्याचे गायक होते. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी मैफिलीत पहिले गाणे सादर केले. १९९४ पर्यंत संगीतकार म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. राशीद खान यांच्या पश्चात पत्नी सोमा, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण सह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पंडित भीमसेन जोशी यांचा आशीर्वाद -

उस्ताद राशिद खान हे रामपूर सहसवान घराण्याचे गायक होते. ही गायकी ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित आहे. राशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खान आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या गायन शैलीचा प्रभाव होता. भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांनी मैफिली केल्या. पुण्याच्या सवाई महोत्सवात ते गायचे. राशिद खान हे हिंदुस्थानी गायक संगीताचे भविष्य असल्याचे वक्तव्य भीमसेन जोशी यांनी केले होते. दोघांचे घराणे वेगळे असले तरी राशीद यांनी भीमसेन जोशी यांची रसिकाभिमुख गायकी पुढे नेली.

बॉलीवूडमध्ये योगदान -

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या जब वी मेट या चित्रपटातील आओगे जब तुम ही बंदिश उस्ताद राशिद खान यांनी गायली होती. माय नेम इज खान, राझ ३, मंटो आणि शादी में जरूर आना यांसारख्या चित्रपटांमधील गाणी देखील उस्ताद राशिद यांनी गायली आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos