सात वर्षीय मुलीला सोबत घेऊन गेला : बल्लारपुरात २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सात वर्षीय अल्पवयीन मुलीला पालकांच्या परवानगीशिवाय सोबत घेऊन गेल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) व ९७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
६ ऑक्टोबर रोजी सकाळी मुलगी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर ऑटोची प्रतीक्षा करीत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला घरी चल, असे सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरून तिला घराजवळ नेले. त्यानंतर मुलगी तेथे खेळत असताना संबंधित तरुण त्यांचा घरात जाऊन झोपला.
काही वेळाने तो मुलीची सायकल घेऊन आला. सायकल विकून तुला नवीन सायकल घेऊन देतो, असे सांगून त्याने मुलीला सोबत नेले. त्यानंतर तिची सायकल विकल्याचे त्याने सांगितल्याचे मुलीने घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना सांगितले.
दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मुलीची आई कामावरून परत येत असताना मुलगी रस्त्यात आढळून आली. मुलगी तेथे कशी आली, याबाबत विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. सायंकाळी घरी परतल्यानंतरही मुलीने कुटुंबीयांना सकाळपासून घडलेली संपूर्ण घटना सांगितली.
या घटनेनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पोलीस हवालदार यशवंत नैताम पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




