महत्वाच्या बातम्या

 वर्धा येथे सौरऊर्जेवरील फ्लड लाईट टॉवरचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन


- वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी २७ कोटी
- आता रात्रीदेखील खेळाडू करू शकतील सराव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : खेळाडूंना रात्री देखील सराव करता यावा, यासाठी जिल्हा क्रीडा संकूल वर्धा येथे १ कोटी २४ लक्ष रुपये खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे फ्लड लाईट टॅावर बसविण्यात आले आहे. या टॅावरचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी क्रीडा मंत्री संजय बनसोडे होते. तर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. वर्धा जिल्ह्यासाठी आपण मिशन ऑलिम्पिक २०३६ डोळ्यापुढे ठेवले आहे. जिल्ह्याला ऑलिम्पिक पदक प्राप्त करून देण्याचा आपला संकल्प आहे. या संकल्पाला फ्लड लाईटच्या रुपाने प्रकाशाचा आशीर्वाद लाभला आहे. आता रात्री देखील खेळाडूंना चांगला सराव करता येईल, असे ते म्हणाले.

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी निधी मंजूर झाल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. ‘वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी निधी मिळावा अशी मागणी आमदार डॅा.पंकज भोयर यांनी केली होती. वर्धा येथे येताना निधी मंजुरीचा आदेश घेऊन येतो, असे मी म्हणालो होतो. त्याप्रमाणे जिल्ह्यासाठी २७ कोटी रुपयांच्या विविध क्रीडा विषयक कामांना प्रशासकीय मंजुरीचा आदेश घेऊन आलो आहे. जिल्ह्याला आणखी निधी पाहिजे असल्यास उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली. त्याचवेळी मंजुरीचा आदेशही त्यांनी आमदार डॉ.भोयर यांना सुपूर्द केला.

आमदार डॉ.भोयर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, फ्लड लाईटमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या क्रीडा सुविधांसाठी क्रीडामंत्र्यांकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापेक्षा जास्त २७ कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. प्रशासकीय मान्यता देखील उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांचे आभार मानले.

तत्पूर्वी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच क्रीडा मंत्री बनसोडे यांनी फित कापून टॉवरचे उद्घाटन केले. त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते टॅावरची कळ दाबून फ्लडलाईट प्रकाशित करण्यात आले. क्रीडा संकुलाच्या चारही बाजूंना चार टॉवर उभारण्यात आल्याने रात्री देखील खेळाडूंना सराव करता येणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos