महत्वाच्या बातम्या

 ४ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत असलेला गंभीर गुन्हयातील फरार आरोपीस अटक : गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : डिसेंबर २०१८ मध्ये फिर्यादी महीला आशा प्रकाश गंगावणे, रा. झोपडी मोहल्ला, यादव चौक, गोंदिया हीचे बहिणीच्या राहते घरून सतनामी मोहल्ला, यादव चौक गोंदिया येथुन फिर्यादीची भाची (पिडीत) हिला तिची आई १) सुनिता मेश्राम, २) निक्की दुर्गेश मेश्राम (३४) ३) आशा अनिल कांबळे (४०) यांनी संगनमत करून विक्री करण्याचे उद्देशाने तिचे अपहरण करून तिला भोपाळ येथे नेवून ४) शुभम डेहरीया (२१) ५) जसवंत ठाकूर (२५) ६) प्रशांत पांडे (२८) ७) लक्की बरमैय्या (२२) यांना पैशाच्या लालचीने विक्री केली असल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक १३४/२०१९ कलम ३६६ (अ), ३७० भादंवि सहकलम १७ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. 

सदर नमुद गुन्हयातील महत्वाचा आरोपी प्रविण उर्फ लक्की राजेश बरमैया (२७) वर्ष, रा. वीस खोली सुक्लूधाना, पो.स्टे. कुंडीपुरा, जि. छिंदवाडा (म.प्र.) हा मागील चार वर्षापासून पोलीसांची दिशाभूल करून पोलीसांना मिळत नव्हता.

पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा साो. कॅम्प देवरी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे यांनी ४ वर्षा पासून गुन्ह्यांत पाहिजे असेलल्या आरोपीस जेरबंद करण्याचें निर्देश सूचना दिल्या होत्या.

यावरून वरिष्ठांचे प्राप्त आदेश निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली, पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी, पो.स्टे. गोंदिया शहर यांचे नेतृत्वातील पोलीस पथक पो.उपनि. मंगेश वानखडे, पो.हवा. श्यामकुमार कोरे/१५०७, पो.शि. सुमित जांगळे/२१४४ यांनी आरोपीच्या ठावठिकाणा बाबत गोपनीय माहीती काढुन छिंदवाडा (म.प्र.) येथे जावून सापळा रचून ०९ डिसेंबर २०२३ रोजी ताब्यात घेतले.

मागील चार वर्षापासून पाहिजे असलेला गंभीर गुन्हयातील महत्वाच्या आरोपीस पोलीस पथकाने अथक परिश्रम करून ताब्यात घेवून अटक केले आहे. पुढील न्यायालयीन कार्यवाही व सदर गुन्हयाचा तपास पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो.उपनि. मंगेश वानखडे हे करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos