महत्वाच्या बातम्या

 चीनमध्ये न्यूमोनिया आजाराचा वाढला फैलाव : केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाचे संकट दुर झालेले असतानाच आता चीनमध्ये नव्या आजाराने डोके वर काढले. गेल्या काही दिवसांपासून चीनच्या उत्तर भागात न्यूमोनियासदृश तापाच्या तक्रारी वाढत आहे.

त्यामुळे सर्वच देशांनी याची धास्ती घेतली असून याप्रकरणी चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना रविवारी सतर्कतेच्या सूचना दिल्या.

सर्व राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये उद्भवलेल्या या आजारात लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याने त्यादृष्टीनेही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय एन्फ्लूएन्झासदृश आजार तसेच, तीव्र स्वरूपाचा श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांवर जिल्हा तसेच, अन्य शासकीय रुग्णालयांनी विशेष लक्ष ठेवण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना दिल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार श्वसनासंबंधीत या आजार इन्फ्लूएंजा, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या कारणांमुळे होत आहे. आरोग्य मंत्रालय या आजाराच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देऊन आहे. सध्या काळजी करण्याची आवश्यकता नाही असेही सांगण्यात आले आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तत्काळ सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाची स्थितीचा आढवा घेण्यास सांगितले आहे.

यासोबतच मानवी संसाधने, रुग्णालयातील बेड, अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, पीपीई, चाचणी किट इत्यादींची पुरेशी उपलब्धता करण्याचे निर्देश दिले आहे. याव्यतिरिक्त, आरोग्य सेवा सुविधांनी त्यांचे ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण नियंत्रण प्रोटोकॉलचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केले पाहिजे, असे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये पसरणाऱ्या इन्फ्लूएंझासदृश आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजार वर बारकाईने निरीक्षण ठेवण्यात यावे. राज्य अधिकाऱ्यांनी श्वासोच्छ्वासाचे आजार असलेल्या रुग्णांचे नाक आणि घशाचे स्वॅब नमुने विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांना पाठवावेत, असेही सांगण्यात आले आहे.

देशातील स्थितीवर केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे, चीनमधील तापामुळे तूर्तास काळजी करण्याचे कारण नसल्याचे देखील केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तर डब्ल्यूएचओने देखील चिनी अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे, परंतु यावेळी चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.





  Print






News - World




Related Photos