तब्बल १४९ वर्षांनी पाहता येणार गुरुपौर्णिमा - चंद्र ग्रहणाचा दुर्मिळ योग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
काळाकुट्ट अंधार, लालभडक-मोठ्या आकाराचा चंद्र अशी अनोखी खगोल पर्वणी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने आज १६ जुलै रोजी  भारतीयांना अनुभवायला मिळणार आहे. भारतात आज होणार चंद्रग्रहण हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणचा एकत्रित दुर्मिळ योग तब्बल १४९  वर्षांनी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज होणारे चंद्रग्रहण ही खगोल प्रेमींसाठी एक विशेष पर्वणी समजली जात आहे.
भारतात आज दिसणारे चंद्रग्रहण किमान २ तास ५९ मिनीटे राहणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री १  वाजून ३१ मिनीटांनी ग्रहणाला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ जुलैला पहाटे ४ वाजून ३१ मिनीटांनी ग्रहण संपेल. दरम्यान आज संध्याकाळी ६ नंतर देशभरात चंद्रदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे १२ जुलै १८७० नंतर तब्बल १४९ वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा खास पर्वणी खगोल अभ्यासकांना अनुभवता येणार आहे.
यंदाच्या वर्षात भारतात एकूण ५ ग्रहण आहेत. त्यात ३ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहणांचा समावेश आहेत. यातील एक चंद्रग्रहण वर्षाच्या सुरुवातीला २१ जानेवारीला झाले. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसले नव्हते. मात्र त्यानंतर आज १६ जुलैला चंद्रगहणाचा योग आला आहे. विशेष म्हणजे भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असून हे यंदाच्या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. यानंतर भारतीयांना थेट १६ डिसेंबरला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. 
हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण जगभरात पाहता येणार आहे. आशिया खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका यासह अन्य काही देशात ग्रहण पाहता येणार आहे. तसेच भारतात महाराष्ट्र, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल या ठिकाणी पाहता येणार आहे.
दरम्यान आज होणारे चंद्रग्रहण हे तुम्ही उघड्या डोळ्यांनीही पाहू शकणार आहात. यासाठी तुम्हाला विशेष दुर्बीण किंवा इतर वस्तूंची गरज पडणार नाही. तसेच जर तुमच्याकडे दुर्बीण उपलब्ध असेल, तर तुम्हाला अत्यंत चागल्या पद्धतीने ग्रहण दिसेल.
आज होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास पद्धतीचे आहे. यावेळी चंद्र हा लाल तांबूस रंगाचा दिसणार आहे. त्यामुळे आकाश लाल रंगाची उधळण झाल्यासारखे भासणार आहे. तसेच ग्रहणादरम्यान पृथ्वीवरुन चंद्र थोडा जवळ आणि मोठा दिसणार आहे.

 
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-16


Related Photos