महत्वाच्या बातम्या

 पीसीएमच्या विद्यार्थ्यांचाही डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा : ही अट शिथिल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) असा मुख्य विषयगट असलेल्या विद्यार्थ्यांचाही नीट परीक्षा देऊन डॉक्टर बनण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र या विद्यार्थ्यांना कुठल्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची जीवशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान विषयाची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) ऑक्टोबर महिन्यात नीटचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करताना हे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या केंद्रीय प्रवेश परीक्षा घेणाऱ्या संस्थेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

नीट-२०२४ पासून हे बदल लागू असतील. एनटीएऐवजी एनएमसीकडून सुधारित अभ्यासक्रम जाहीर करण्याच्या प्रकारामुळे सुरुवातीला गोंधळाचे वातावरण होते, मात्र ते आता दूर होणार आहे.

ही अट शिथिल -

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अकरावी-बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान (पीसीबी) या विषयांचा इंग्रजी विषयासह दोन वर्षांचा अभ्यास, तोही नियमित कनिष्ठ महाविद्यालयातून (प्रात्यक्षिकांसह) करणे आवश्यक होते. परंतु, आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा झाल्यानंतर ज्यांनी पीसीएम हा विषयगट निवडला होता. त्यांनाही जीवशास्त्राची स्वतंत्रपणे परीक्षा देऊन नीटसाठी पात्र होता येईल. अशा विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जायचे असल्यास एनएमसी तसे प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांना देईल.

बदल काय?

एनएमसीने नीट, २०२४ च्या अभ्यासक्रमातही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमातून नऊ तर जीवशास्त्रातून सहा धडे वगळण्यात आले आहेत. तर भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रात पाच नवीन उपविषय समाविष्ट करण्यात आले आहेत. पण एकूणच अभ्यासक्रमाला काही प्रमाणात कात्री लागली आहे.

वगळलेले धडे -

रसायनशास्त्र-स्टेट ऑफ मॅटर, हायड्रोजन, दी एस-ब्लॉक एलिमेंट्स, पर्यावरण रसायनशास्त्र, दी सॉलिड स्टेट, सरफेस केमिस्ट्री, जनरल प्रिन्सिपल्स ॲण्ड प्रोसेसेस ऑफ एलिमेंट्स, पॉलिमर्स, दैनंदिन रसायनशास्त्र, जीवशास्त्र-ट्रान्सपोर्ट इन प्लान्ट्स, मिनरल न्युट्रिशन, डायजेशन ॲण्ड अब्सॉर्प्शन, रिप्रोडक्शन इन ऑरगॅनिझम, स्ट्रेटेजिस फॉर एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन, न्व्हायर्नमेंटल इश्यूज

मग, बदल आधीच करायचे !

क्लास चालकांनी अभ्यासक्रम वगळण्याच्या निर्णयाला विरोध केला. अभ्यासक्रमाचा ताण कमी होणार असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र अभ्यासक्रमात बदल करायचा तो शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच करा, अर्धे अधिक वर्ष झाल्यावर बदल करून विद्यार्थ्यांच्या ताणात वाढ करणे बरोबर नव्हे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos