मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मतभेदामुळे नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड :
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पंजाबच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे म्हटलं जात आहे. सिद्धू यांनी १० जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आज १४ जुलै ला ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील राजीनामा सत्र अद्याप सुरु असल्याचे दिसत आहे.
मी पंजाबमधील मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र नवज्योत सिंग सिद्धू यांनी १० जूनला राहुल गांधी यांना दिले होते. तेच पत्र ट्विट करत सिद्धू यांनी मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. या ट्विटनंतर आणखी एक ट्विट करत त्यांनी मी माझा राजीनामा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात काही बदल केले होते. त्यावेळी नवज्योत सिंह सिद्धू यांच्याकडे असलेल्या खात्यातही बदल करण्यात आले. पूर्वी सिद्धूंकडे नागरी प्रशासन विभाग देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा भार सोपविण्यात आला होता. तसेच  त्यांच्याकडचे पर्यटन आणि सांस्कृतिक खातंही काढून घेण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर सिद्धूंनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर नाराज झालेल्या सिद्धूंनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
विशेष म्हणजे पंजाब सरकारने स्थापन केलेल्या आठ समित्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवज्योत सिंग आणि अमरिंदर सिंग यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. याच वादामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसला चांगलेच खिंडार पडले आहे. लोकसभा निवडणुकांचा पराभव स्वीकारत काँग्रेस नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य सिंधिया या नेत्यांनीर राजीनामे दिले होते. त्यानंतर आता काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी नुकतंच आपल्या पंजाबच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  Print


News - World | Posted : 2019-07-14


Related Photos