केंद्र सरकार आणणार नवी योजना, दिवसा विजेचा दर कमी तर रात्री अधिक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  विजेचा वापर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत असून दिवसा विजेचा दर कमी तर रात्री अधिक ठेवण्यात येणार आहे.  
देशभरात मोठय़ा प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात असून लवकरच त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता सवा लाख मेगावॅटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवसा सौरऊर्जा प्रकल्पातून मिळणारी स्वस्त दराची वीज मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. तर रात्रीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या विजेत सौर प्रकल्पांच्या विजेएवजी इतर प्रकल्पातील विजेचे प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे ती वीज दिवसाच्या विजेच्या तुलनेत महाग असणार  आहे. दिवसा आणि रात्री विजेचे भिन्न दर ठेवण्याबाबतचा प्रस्ताव असून तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. तसेच ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणूनही सरकार नवी नियमावली तयार करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार नैसर्गिक किंवा पुरेशा तांत्रिक कारणाशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधित वीज कंपनीला दंड ठोठावून त्याचा लाभ परिसरातील ग्राहकांना देण्याचा विचार आहे.   Print


News - World | Posted : 2019-07-14


Related Photos