मेयोतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टर ची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
:  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरने शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. मेयोतील 'मार्ड'च्या जुन्या वसतिगृहातील खोली क्रमांक ३३ मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. 
मन्यूकुमार शशिधर वैद्य (२६) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटक राज्यातील ब्यादगी येथील नेहरूनगर येथील रहिवासी होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय चाचणी परीक्षेत त्याचा मेयोतल्या स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातून नंबर लागला होता. मेयोत २ मे  रोजी तो स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र विभागात रुजू झाला होता. अवघ्या दोनच महिन्यांत त्याने असे टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविल्याने वैद्यकीय क्षेत्रातला ताण पुन्हा चर्चेत आला आहे. 
शुक्रवारी सकाळी मन्यूकुमारचा युनिट क्रमांक दोनच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी दिवस होता. सकाळी ८ वाजता बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीसाठी येत असताना डॉ. मन्यूकुमार वॉर्डात पोहोचला नव्हता. त्यामुळे युनिटच्या इन्चार्ज डॉ. अलका पाटणकर यांनी अधिवासिता विद्यार्थी बालेंद्र कुमार गौन आणि मेडिकल ऑफिसर देबरी बिधान या दोघांना वसतिगृहात पाठविले. तरीही मन्यूकुमार सव्वानऊ वाजेपर्यंत खोलीतून कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. बालेंद्र आणि देबरी यांनी खोलीच्या पाठीमागील खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यावेळी मन्यूकुमार पलंगाच्या खाली जमिनीवर कोसळल्याचे त्यांना दिसले. या दोघांनी तडक विभागप्रमुख डॉ. प्रशांत उईके, डॉ. पाटणकर यांना माहिती दिली. त्यानंतर वसतिगृहातील सुरक्षारक्षकांची मदत घेऊन दार उघडले असता डॉ. मन्यूकुमारच्या गळ्याला फास अडकल्याचे त्यांना दिसले. लगेच तहसील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि विभागप्रमुख डॉ. उईके घटनास्थळी दाखल झाले. मन्यूकुमारने सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी आढळले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदन विभागाकडे पाठविला. या घडामोडीत डॉ. मन्यूकुमारने आदल्यादिवशी भावाला पाठविलेल्या मेसेजव्यतिरिक्त इतक्या टोकाचे पाऊल का उचलत आहे, याचा कुठेही उलगडा न केल्याने आत्महत्येवरून गूढ निर्माण झाले आहे.   Print


News - Nagpur | Posted : 2019-07-06


Related Photos