प्रवेश नोंदणीचे सर्व्हर बंद; विद्यार्थी गोंधळात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल : 
नीट आणि सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे.  यंदा दरवर्षीपेक्षा निकालाचा टक्का घसरला आहे.  त्यामुळे पाल्यासह पालकही हैराण झाले आहेत.  त्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी पासून सार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीचा नियम घालून देण्यात आला. १७ ते २१ जूनदरम्यान ही नोंदणी करणे आवश्यक आहे.  परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे पोर्टलच बंद आहे.  त्यामुळे पालक आणि विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. 
नीट आणि सीईटी परीक्षेसाठी जिवाचे रान केलेल्या पाल्य आणि पालकवर्गाची आता वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी धडपड सुरु आहे.  यापूर्वी वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्रकारे नोंदणी करण्यात येत होती.  या वर्षीपासून मात्र शासनाने सार या एकाच पोर्टलवर सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली. 
या पोर्टलवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या लिंक देण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर नोंदणी करताना तब्बल ६८ प्रकारची कागदपत्रे गोळा करीत आहेत.  प्रत्यक्षात कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती कागदपत्रे आवश्यक आहेत.  याबाबत गोंधळच आहे.  याची नेमकी माहिती सेतू किंवा संबंधित विभागालाही नाही.  यापूर्वी केवळ ८ ते १० कागदपत्रे उपलब्ध करुन दिल्यानंतर नोंदणी होत होती़ इतकी कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. 

प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेबाबत सर्वच अनभिज्ञ

१७ ते २१ जूनदरम्यानच ही नोंदणी करण्याची मुदत आहे.  त्यात गेल्या दोन दिवसांपासून हे सर्व्हर बंदच आहे. शासनाकडून तसे स्पष्टही करण्यात आले आहे.  त्यात आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.  यापूर्वी नोंदणीसाठी किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी दिला जात होता.  यावर्षी त्यामध्येही कपात करण्यात आली आहे. त्यावर पोर्टलही बंद असल्यामुळे नोंदणी कशी करायची ? असा प्रश्न आहे .    Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-19


Related Photos