‘सीईटी’बाबत तक्रार दाखल करता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल
: यंदा प्रथमच सीईटी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आणि पहिल्यांदाच पर्सेन्टाइल पद्धतीने तिचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सीईटी सेलने त्यांना तक्रार दाखल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या तक्रारींवर तज्ज्ञांची समिती आणि आयटी टीम काम करून अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सीईटी सेलकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत एमएचटी सीईटी परीक्षा यंदा प्रथमच ऑनलाईन घेण्यात आली होती. शिवाय यंदा प्रथमच पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. तसेच पहिल्यांदाच सीईटी वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आली. प्रत्येक दिवशीची काठीण्य पातळी पाहून हे पर्सेन्टाइल काढण्यात आले. मात्र, याबाबत संभ्रम व्यक्त करण्यात येत आहे. यावर उपाय म्हणून एकाच दिवशी आॅफलाइन परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र जेईईच्या सूत्रांचा वापर करून हे पर्संेटाइल तयार करण्यात आल्याचे मत सीईटी सेलचे अध्यक्ष आनंद रायते यांनी व्यक्त केले.
तरीही पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम असल्याने सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या तकार निवारणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संकेतस्थळावर दाख करा तक्रारी

विद्यार्थ्यांना ११ जून ते १३ जूनदरम्यान आपल्या तक्रारी www.mahacet.org या संकेतस्थळावर दाखल करता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्याला एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या एकूण बेरजेच्या संदर्भातच तक्रार दाखल करता येणार आहे. १४ जून रोजी तज्ज्ञांची समिती आणि आयटी टीमकडून या तक्रारीची पडताळणी होणार असून, १५ जून रोजी सायंकाळी ७ नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारींची उत्तरे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांची उत्तरपत्रिका आणि तक्रारींचे उत्तर दिसणार आहे.
   Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-10


Related Photos