२८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा पेच


वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय जनता पक्षापुढे  आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्याचे आव्हान  आहे. यातच २८८ पैकी निम्म्या जागा शिवसेनेने मागितल्याने भाजपपुढे जागावाटपाचा मोठा पेच उभा राहिला आहे.  लोकसभेच्या निवडणुकीत 'आरपीआय'चे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे त्यांना भाजपने आपल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, अशी अट शिवसेनेने घातली आहे. 
१३५ आणि १३५ जागा शिवसेना आणि भाजपने लढवून उर्वरित १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा फॉर्म्युला भाजपने ठेवला होता; परंतु तो शिवसेनेने नाकारला आहे.  विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर असे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत; परंतु १३५ जागा वाट्याला आल्या तरी विद्यमान १२२ आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे या १२२ आमदारांना तिकिटे दिली तर केवळ १३ जागा भाजपच्या हाती आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अनेक आमदार भाजप प्रवेशाच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे जागांचा मोठा पेच भाजपपुढे आहे. 
 दुसरीकडे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीतील उमेदवारही पुन्हा इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे तिकीट नाही मिळाले तर बंडखोरी होण्याचा धोकाही भाजप आणि सेनेसमोर आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-06-07


Related Photos