पांढऱ्या गुळाच्या साठेबाजीविरोधात व्यापाऱ्यांचा पुढाकार, अहेरीत व्यापारी संघटनेची बैठक


-  मद्यनिर्मिती रोखण्याचा निर्धार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या पण तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने व्यापारी दृष्टीने महत्वाच्या अहेरी तालुक्यात पांढऱ्या गुळाची दारू तयार करून विकण्याचा उद्योग फोफावला आहे. यासाठी पांढऱ्या गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. गुळाच्या अतिरिक्त विक्रीवर अंकुश आणण्यासाठी अहेरी येथे शहरातील व आलापल्ली येथील किराणा दुकानदार आणि व्यापारी वर्गाची बैठक मुक्तिपथच्या पुढाकाराने घेण्यात आली. बैठकीला व्यापाऱ्यांसह मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता, नायब तहसीलदार अनिल गुहे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. पांढऱ्या गुळाची साठेबाजी आणि मद्यनिर्मिती रोखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली.
अहेरी तालुक्यात पांढऱ्या गुळापासून मद्यनिर्मितीच्या उद्योगाला पेव फुटले आहे. पांढरा गुळ हा खाण्यासाठी उपयोगात येत असल्याने या गुळावर सरसकट बंदी घालता येत नाही. याचाच फायदा घेत तालुक्यातील प्राणहिता नदीलगतच्या बोरी, राजपूर पॅच, महागाव, दल्लेवाडा, मद्दीगुडम यासह इतरही  अनेक गावांमध्ये पांढऱ्या गुळाची दारू बनवून त्याची अहेरीसह इतरही तालुक्यात विक्री करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. यासाठी गुळाची मोठ्या प्रमाणात आवक अहेरी आणि आलापल्ली येथे होते. याविरोधात मुक्तिपथ गाव संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारू, गुळसडवे, दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू आहे. पण पांढऱ्या गुळाचा ओघ तेवढाच वाढल्याने मद्यनिर्मिती थांबायला तयार नाही. काहीच दिवसांपूर्वी आलापल्ली शहरात होणारी पांढऱ्या गुळाची साठेबाजी मुक्तिपथने उघड करताच हा प्रकार सर्वांच्या निदर्शनास आला. यावेळी संबंधितांवर पोलीस कारवाई करून ट्रकभर पांढरा गुळ जप्त करण्यात आला. पण यानंतरही पांढऱ्या गुळाची साठेबाजी आणि मद्यनिर्मिती सुरूच असल्याने गुळाच्या साठेबाजीविरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी अहेरी येथील किराणा दुकानदार आणि व्यापाऱ्यांची बैठक मुक्तिपथच्या पुढाकाराने घेण्यात आली. यात पांढऱ्या गुळाचा साठा, विक्री याविषयी काही कठोर नियम तयार करण्यात आले.

करण्यात आलेली नियमावली    

1.     यामध्ये सर्वप्रथम गुळाच्या साठवणुकीची मर्यादा ठरविण्यात आली. होलसेल विक्रेत्यांशी चर्चा करून एक दुकानदार १०० बॉक्स ठेवणार असा नियम करण्यात आला.

2.     शहरातील दुकानदारांना एका वेळी ३ ते ५ पेट्या विकता येणार तसेच त्याची रजिस्टरवर नोंद घेतली जाणार. ५ किलोच्या वर कोणालाही खुला गुळ विकता येणार नाही.  

3.     होलसेल विक्रेता केवळ ओळखीच्याच विक्रेत्यांना ३ ते ४ पेट्या गुळ देऊ शकेल.

4.     गुळ ठेवल्या जात असलेल्या जागेची माहिती ठेवली जाईल.

5.     होलसेल माल वाटप होईपर्यंत गोदामात ठेवता येईल.

6.     महिन्यातून जास्तीत जास्त दोन ट्रक माल आणता येईल. त्याची माहिती पोलीस स्टेशन ला देणे बंधनकारक.

7.     अहेरी, अलापाल्लीतील किराणा दुकानदार ५ पेटी गुळ ठेवू शकणार.

8.     बाहेर गावातील विक्रेत्यांना १० पेटी गुळ देता येणार

9.     सम्मक्का सरवक्का यात्रा, मोहरम साठी गुळ देता येणार. पण त्याची नोंद रजिस्टरमध्ये घेणे बंधनकारक.

10.विक्रेते होलसेलर की रिटेलर याची संघटनेत नोंदणी करणे बंधकारक.


दंडाची तरतूद

गुळ विक्री आणि साठवणुकीबाबत तयार करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे विक्रेत्यांना बंधनकारक असणार आहे. होलसेल विक्रेत्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वप्रथम २ हजार, दुसऱ्यांदा ५ हजार आणि तिसऱ्यांदा १० हजार रुपये दंड आकाराला जाणार आहे. यानंतरही नियम मोडल्यास व्यापारी संघटनेद्वारे विक्रेत्यांची परवानगी रद्द केली जाणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-05


Related Photos