मोफत लॅपटॉप ची योजना असल्याचे दाखवून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला अटक


- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप ची योजना असल्याचे भासविले 
- बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली :
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत असं सांगणारी फेक वेबसाइट तयार करून लोकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या आयआयटी पदवीधराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राकेश जांगीड असं या तरुणाचे नाव असून तब्बल १५ लाख लोकांना या तरुणाने फसवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  
२३ वर्षांचा राकेश जांगीड राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील पुंडलोटाचा रहिवासी आहे. २०१९ मध्ये आयआयटी दिल्ली येथून पदव्युत्तर पदवी त्याने मिळवली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मोफत लॅपटॉप वाटले जात आहेत अशी माहिती देणारा संदेश व्हाट्सॲपवर राकेश जांगीडने व्हायरल केला. मेक इन इंडियाच्या लोगोसह हा संदेश पाठवण्यात आला असल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला. लॅपटॉपसाठी www.modi-laptop.wishguruji.com या संकेतस्थळावर नावनोंदणी करा असंही या संदेशात सांगण्यात आलं होतं. त्यानुसार तब्बल १५ लाख लोकांनी तिथे नाव नोंदणी केली. नावनोंदणी सोबतच आधार कार्ड,बँक खाते अशा अनेक गोपनीय गोष्टींची माहिती या संकेतस्थळावर विचारण्यात आली होती. या माहितीच्या आधारे लोकांना लुटण्याचा या तरुणाचा प्लॅन होता. 
या फेक वेबसाइटची कुणकुण दिल्ली पोलिसांच्या सायबरपॅड या सायबरसेलला लागली. संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला दिल्ली पोलिसांनी लगेच अटक केली. हैदराबादमधील एका खासगी कंपनीतील नोकरीवर पाणी सोडून या फेक वेबसाइटचा घाट या तरुणाने घातला होता. या वेबसाइटवर येणाऱ्या ट्रॅफिकच्या साहाय्याने गुगल ॲड्स मिळवून पैसे कमवण्याचा आपला मनसूबा असल्याचं या तरुणाने चौकशीत कबूल केलं आहे. तसंच लोकांचे बॅंक खाते आणि इतर माहितीच्या साहाय्याने त्यांना लुटून पैसे कमवणार असल्याचंही या तरुणाने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान या तरुणाची सखोल चौकशी केली जात असून याशिवाय अजून कोणी अशी फेक वेबसाइट चालवत आहेत का याची माहिती पोलीस काढत आहेत. 

   Print


News - World | Posted : 2019-06-03


Related Photos