रब्बी हंगामातील बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा


- हरभरा, मसूर, करडई, ज्वारी व मक्यासाठी अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कडधान्य, तेलबिया तसेच पौष्टिक तृणधान्य व भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी हंगामात विविध पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत हरभरा, मसूर, करडई, ज्वारी आणि मका या पिकांसाठी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध पिकांच्या बियाण्यांवर अनुदान -
रब्बी हंगामातील प्रमाणित बियाणे वितरणासाठी पिकानुसार वाणाच्या कालावधीप्रमाणे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
हरभरा : पाच वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाणे किमतीच्या ७५ टक्के अनुदान, तर पाच वर्षांपेक्षा अधिक आणि दहा वर्षांपर्यंतच्या वाणांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
मसूर : पाच वर्षांच्या आतील नवीन वाणांसाठी बियाणे किमतीच्या १०० टक्के अनुदानाची तरतूद आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक आणि दहा वर्षांपर्यंतच्या वाणांसाठी ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
करडई : करडई बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मका : दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाणे किमतीच्या ५० टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
ज्वारी : दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी ३३ टक्के अनुदान, तर दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या वाणांसाठी १७ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र राहतील. यामध्ये आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड आदी संस्थांशी संबंधित पात्र गट व संस्थांचा समावेश आहे.
रब्बी हंगामातील बियाणे वितरणाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कडधान्य, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्यांच्या उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन -
वरील सर्व बियाणे घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व संबंधित संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.
योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी किंवा सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे.




Petrol Price




