छुपा प्रचार सुरु , आता लढतीकडे लक्ष !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/  गडचिरोली :
  गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील प्रचारतोफा काल ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास थंडावल्या असुन छुपा प्रचार सुरु झाला आहे.  आता उद्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून  पाच उमेदवारांच्या लढतीकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारामध्ये भाजपा- युतीचे उमेदवार अशोक नेते , काँग्रेस - आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी,   वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. रमेशकुमार गजबे, बसपाचे उमेदवार हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे हे आपआपले नशीब आजमावित आहेत. 
  २०१४ च्या निवडणुकीत डॉ.रमेशकुमार गजबे हे आम आदमी पार्टी कडुन उभे होते. त्यावेळी डॉ.गजबे यांनी ४५ हजार ४५८ मते घेतली होती तर बसपाचे उमेदवार रामराव नन्नावरे यांनी ६६ हजार ९०६ मते घेतली होती.  २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी कोणतीही लाट नसल्यामुळे सरळ- सरळ २००९ च्या राजकीय वातावरणाशी  ही निवडणुक मिळती - जुळती वाटत आहे. २००९ च्या निवडणुकीत मारोतराव कोवासे यांनी ३ लाख २१ हजार ७५६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा- युतीचे उमेदवार अशोक नेते यांनी २ लाख ९३ हजार १७६ मते घेतली होती. केवळ २८ हजार ५८० मतांची आघाडी कोवासे यांना मिळाली होती. त्यावेळी लोकसभा क्षेत्रातील ६ पैकी ४ विधानसभाक्षेत्रात काँग्रेसचे आमदार होते. यावेळी ५ विधानक्षेत्रात भाजपाचे आमदार आहेत.तर  २०१४  च्या निवडणूकीत नेते यांना तब्बल ५ लाख ३५ हजार ( ५२.१८ टक्के) मते व डॉ. उसेंडी यांना २ लाख ९९ हजार ११२ ( २९.१२ टक्के ) मते मिळाली होती. पुर्नरचित गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातील २००९ व २०१४ च्या दोन्ही निवडणुकीत भाजपा- युती व काँग्रेस - आघाडीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत झाली होती.  ११ एप्रिल रोजी पाच उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच कोणाचे भाग्य फळफळेल हे स्पष्ट होणार आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-10


Related Photos