मतदारांना पाठविणार मराठी, बंगाली, माडीया व तेलगु भाषेतून पोस्ट कार्ड - जिल्हाधिकारी शेखर सिंह


-  मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम
- मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे- जिल्हाधिकारी शेखर सिंह
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत असून ११ एप्रिल रोजी  मतदानाच्या दिवशी मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे  मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. मतदारांमध्ये  जागृतीसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना मतदानाचे महत्व पटावे यासाठी  संदेश देणारे पोस्ट कार्ड मराठी, बंगाली, माडीया व तेलगु या भाषेतून  तयार करण्यात आली आहे.  साडेसात लाख मतदारांना ही पोस्ट कार्डस् पाठविण्यात येत आहे. यामध्ये मतदानाची वेळ व अन्य माहिती यांचा समावेश आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 
  जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना निळ, 'आत्मा' चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार,   पडघन, नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, सहाय्यक करपे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, 'स्विप' कार्यक्रमांतर्गत  मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.  यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. २५ जानेवारी या राष्ट्रीय मतदार जागृती दिवसापासूनच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  याअंतर्गत विविध स्पर्धा, पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली व इतर उपक्रमांचा समावेश आहे.  मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नविन २२ हजार युवा मतदार आहेत.    महिला व युवा मतदारांनी मतदानासाठी मोठया संख्येने पुढे येण्यासाठी त्यांना विशेषत्वाने आवाहन करण्यात येत आहे.  महाविद्यालयामार्फत कॅम्पस ॲम्बॅसिडर यासंकल्पने अंतर्गतही मतदार जागृती करण्यात येत आहे. सेल्फी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत विविध पारितोषिके देण्यात येणार आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका मार्फतही मतदार जागृतीचे कार्यक्रम गावागावात घेण्यात येत आहेत. 
ईव्हिएम तसेच व्हिव्हिपॅट संदर्भातही जनजागृती करण्यात येत आहे.  ८७१ ठिकाणी या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.  सुमारे ४७ हजार लोकांनी  याची चाचणी केली आहे.  मतदानासंदर्भातील दुसरे प्रशिक्षणही पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.  
 गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात फोटो व्होटर स्लिपचे वाटप सुरु असून मतदारांना फोटो व्होटर स्लिप मिळाली नसल्यास संबंधित ' बिएलओंशी ' संपर्क साधून मतदार चिठ्ठी प्राप्त करुन घ्यावी.
   मतदानासाठी फोटो व्होटर स्लिपसोबत ११ ओळखपत्रांपैकी १ ओळखपत्र आवश्यक असून ते ग्राह्य धरले जाईल.  निवडणूक आयोगाने विविध ११ ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.
निवडूक आयोगाने संकेतस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास कोणती ११ ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येईल याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहे.  त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे.  परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. 
   दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रिया सहजसुलभ व्हावी, त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग मोठ्या संख्येने वाढावा. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था, सहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी,मदत कक्ष आदी व्यवस्थेसह दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्य़ात असे निर्देशही देण्यात आले आहेत. वृध्द, गरोदर व स्तनदामाता, या मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहावे लागु नये यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात  आल्या आहेत.        
गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. २२०३ दिव्यांग मतदार असून जिल्ह्यात १६४ मतदान केंद्रांवर ३६५ व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.  
जिल्ह्यात दिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे.  अंध, मुकबधिर, शारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता १६४ मतदान केंद्रांवर ३६५ व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत.  दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रावर मदत पुरविली जाणार आहे.  यासाठी एन.सी.सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.  ६७ -आरमोरी (एस.टी.), अंध ११४ , मुकबधीर १२७ ,शारिरीक अपंग ४२७ इतर अन्य ३५ असे एकूण ७०३ .  ६८ -गडचिरोली (एस.टी.), अंध १०४ , मुकबधीर ७४ , शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ४४ एकूण ६९१ .  ६९ - अहेरी (एस.टी.), अंध ११३ , मुकबधीर १०७ , शारिरीक अपंग ४६९ इतर अन्य ९३ एकूण ८०२ .  एकूण अंध ३५१ , एकुण मुकबधीर ३०८ , एकूण शारिरीक अपंग १३६५ , इतर अन्य १७२ असे एकूण २१९६ दिव्यांग मतदार आहेत.

६७ - आरमोरी.( एस.टी) मतदान केंद्र ६२ व्हिलचेअर संख्या १३४ , ६८ - गडचिरोली (एस.टी.) मतदान केंद्र ४९, व्हिलचेअर ४९, ६९ - अहेरी (एस.टी.) मतदान केंद्र ५३, व्हीलचेअर संख्या १८२ एकूण मतदान केंद्र १६४ , व्हिलचेअर ३६५ . उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.     Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-07


Related Photos