महत्वाच्या बातम्या

 डी.एड. कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ : पहिल्या फेरीअखेर राज्यभरात केवळ ४ हजार प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : समाजात मिळणारा मानसन्मान आणि एक सुरक्षित नाेकरी म्हणून शिक्षकी पेशाकडे पाहिले जात हाेते. मात्र, मागील दहा ते बारा वर्षांपासून शिक्षण क्षेत्राचे वाढते खाजगीकरण तसेच पदभरतीअभावी डी. एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेराेजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता तुम्हाला शिक्षक व्हायचेय का? अशी विचारणा केली तर नकाे रे बाबा असे म्हणण्याची वेळ आली आहे. यावर्षी डी.एड. पदविकेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील अध्यापक विद्यालयात पहिल्या फेरीअखेर केवळ ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी डी.एड. ला प्रवेश घेतला आहे.

राज्यात १६ शासकीय, ९७ अनुदानित आणि विनाअनुदानित असे एकूण ५७५ अध्यापक विद्यालय असून, त्यांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ३१ हजार २०७ एवढी आहे. यावर्षी डी.एड. पदविकेला प्रवेश घेण्यासाठी केवळ १३ हजार ७९८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ११ ते १४ जुलै या कालावधीत पार पडली. मंजूर केलेल्या ६ हजार ७२८ जागांपैकी केवळ ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीला १८ जुलै राेजी सुरुवात झाली असून, प्रवेशासाठी ४ हजार ७८८ जागा मंजूर केल्या आहेत. येत्या २१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

२१ अध्यापक विद्यालये बंद -

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी.एड. प्रवेशासाठी केवळ १३ हजार ७९८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अनेक अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडणार आहेत. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१ विद्यालये बंद झाली असल्याचे दिसून येत आहे.

डी.एड्.कडे ओढा कमी हाेण्याची कारणे?

राज्यात खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये अत्यल्प पगारात हजाराे शिक्षक काम करीत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल साठ ते सत्तर हजार पदे रिक्त असतानाही शिक्षण विभागाचा पदभरतीबाबत उदासीन दृष्टिकाेन यामुळे विद्यार्थ्यांनी डी.एड. कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे, तसेच झटपट नाेकरी मिळावी यासाठी काैशल्यावर आधारित काेर्सेस आणि पदविका, पदवीला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील डी.एड. प्रवेश आकडेवारी -

शैक्षणिक वर्ष : महाविद्यालयांची संख्या - प्रवेशक्षमता - प्रवेश निश्चित

२०२२-२३ : ५९५ - ३२६४७ - १८५५२

२०२३-२४ : ५७४ - ३१२०७ - ३९४७ ( पहिल्या प्रवेश फेरीअखेर)

पुणे जिल्ह्यातील प्रवेशाची परिस्थिती -

एकूण विद्यालये - प्रवेशक्षमता - प्रवेश अर्ज - प्रवेश निश्चित

२३ - १४६० - २१५ - १३७ (पहिली फेरी अखेर)





  Print






News - Rajy




Related Photos