भंडारा जिल्हयात ४ हजार ८७२ दिव्यांग मतदार, २८६ व्हीलचेअर , १ हजार ७१ रॅम्पची व्यवस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा 
: दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा राहणार आहे. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी एकूण २८६ व्हीलचेअर व एकूण १०७१ रॅम्पची व्यवथा करण्यात आली आहे.   
राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या २  लाख २४  हजार १६२ इतकी आहे. भंडारा  जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ४८७२ एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात १२५६, भंडारा विधानसभा क्षेत्रात १४९०, साकोली विधानसभा क्षेत्रात २१२६ असे एकूण  ४ हजार ८७२  दिव्यांग मतदार आहेत. 
दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने ७  तालुक्यात कार्यरत मतदान केंद्रावर २८६  व्हीलचेअर व १०७१ रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.
तुमसर-२६५, साकोली-३२८ व भंडारा-२७५ असे एकूण जिल्हयात ८६८ केंद्रात दिव्यांग मतदारांची संख्या आहे. या पैकी काही मतदान केंद्र एकाच इमारतीत अनेक आहेत. दिव्यांग मतदाराच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित माहिती उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या शाळांमधून  प्रशिक्षित कर्मचा-यांना मतदान केंद्रावर मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येणार आहे.
सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.   Print


News - Bhandara | Posted : 2019-04-02


Related Photos