महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री जनआरोग्य योजना : पाच लाखाचे विमा कवच


-  ५ लाखापर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया मोफत

-  कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती योजनेस पात्र

-  योजनेत १ हजार २०९ उपचारांचा समावेश

-  अंगिकृत रुग्णालयात देशात कुठेही उपचाराची सोय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आजारांवर होणारा खर्च सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असतो. बरेचदा आजारावरील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी पैसाची जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे आजार अंगावर काढले जातात. राज्याच्या आरोग्य योजनेसोबत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेने अशा हजारो गरीब कुटुंबांना फार मोठा आधार दिला आहे. या योजनेतून १ हजार २०९ प्रकारचे उपचार केले जातात. हे संपुर्ण उपचार विनामुल्य केले जाते.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत सप्टेंबर २०१८ पासून एकत्रितपणे ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेतून १ हजार २०९ प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया विनामुल्य केल्या जातात. या उपचार, शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबांना प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख इतक्या रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जाते. योजनेचा लाभ कुटुंबातील एका किंवा सर्व सदस्यांना घेता येतो. 

या योजनेत समाविष्ठ रुग्णालयांमध्ये वॉर्डमधील खाटा, परिचारिका, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिअटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयव, रक्त संक्रमण, इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, वाहतुक आदी खर्च योजनेतून केला जातो. रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण उपचार विनामुल्य केले जातात.

देशातील २ कोटी २२ लाख कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ च्या यादीतील नोंदीत ८३ लाख ६३ हजार कुटुंबांतील सदस्य योजनेचे लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात संगणकीकृत ई-कार्ड व फोटो ओळखपत्र दाखवून पात्र कुटुंबातील लाभार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत एका राज्यातील रुग्ण देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया, उपचारांचा लाभ घेऊ शकतो.

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 996 प्रकारच्या उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रती वर्ष १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च विनामुल्य केला जातो. या उपचारांसाठी १ लाख ५० हजार ते ५ लाखापर्यंतचा खर्च प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून केला जातो. केवळ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ठ असलेल्या २१३ उपचारांसाठी पुर्ण ५ लाख रुपयांचा खर्च मात्र प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतूनच केला जातो.

राज्यात ही योजना युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्यावतीने प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष निश्चित केलेली विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये या विमा कंपनीस अदा केली जाते. असंख्य गरीब रुग्णांना या योजनेने आजाराच्या प्रसंगी दिलासा दिला आहे. बहुतांश उपचार व शस्त्रक्रिया योजनेतून होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाची आजारावरील खर्चाची चिंता मिटली आहे.





  Print






News - Wardha




Related Photos