शिक्षक युगेंद्र मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू न.प. शाळेने काढली मुक रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत अतिथी निदेशक (कला) म्हणून कार्यरत युगेंद्र मेश्राम यांची नक्षल्यांनी १० मार्च रोजी गोळ्या झाडून हत्या केली.  या घटनेचा  आज १८ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता जवाहरलाल नेहरू न.प. शाळेच्या वतीने मुक रॅली काढून निषेध करण्यात आला. 
मुक रॅली शाळेपासून इंदिरा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण करणारे व  नक्षल्यांचा निषेध करणारे बॅनर व पोस्टर्स हातात घेतले होते. रॅलीमध्ये जवाहरलाल नेहरू शाळा व रामपूर प्राथमिक शाळेतील ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. 
युगेंद्र मेश्राम यांची पत्नी कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. पत्नीला भेटण्यासाठी युगेंद्र मेश्राम हे बोटेकसा येथे गेले होते.  नक्षल्यांनी  ढोलडोंगरी येथे त्यांची हत्या केली. निरपराध शिक्षकाच्या हत्येमुळे सर्वत्र तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
मुक रॅलीत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मधुकर नैताम, दुधराम महागणकार, नरेंद्र पोवणवार, थामदेव महागणकार, शिक्षिका सहारे, युगेंद्र मेश्राम यांच्या आई, पत्नी, मुलगा, मोठा भाऊ, शाळेतील सर्व शिक्षक, गडचिरोली पोलिस ठाण्यातील कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-18


Related Photos