खुर्शिपार येथे तब्बल ५८ लाख ५३ हजाराची दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी आपल्या पथकासह खुर्शीपार येथे काल १६ मार्च रोजी धाड टाकून तब्बल ५८ लाख ८३ हजार ६०० रूपयाची देशी- विदेशी दारू जप्त केली. याप्रकरणी तिलक बाबुराव उंदिरवाडे (३४) रा.खुर्शिपार ताब्यात घेतले, तर निर्मल धमगाये, ममता निर्मल धमगाये, नितिन निर्मल धमगाये यांच्या विरूध्द कोरची पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 खुर्शिपार येथे मोठ्या प्रमाणात दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना मिळाली. त्यांनी पथकासह खुर्शिपार येथील तिलक उंदिरवाडे याच्या घरी धाड टाकली. यावेळी पोलीसांनी २५ हजार ५० रूपये किमतीची दारू जप्त केली. मात्र खबऱ्याने दिलेली माहिती व प्रत्यक्ष आढळून आलेला दारूसाठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने  त्यांनी उंदिरवाडे याच्या सांगण्यावरून  केवळराम तुलावी याच्या घरी धाड टाकली. या धाडी मध्ये पोलीसांना इम्पेरियल ब्लू कंपनीची ४ हजार ८०० रूपये किमतीची दारू आढळून आली. तसेच ५८ लाख ५३ हजार ६०० रूपये किमतीच्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ३९ हजार २४ बॉटला आढळून आल्या.  हा माल पोलीसांनी  जप्त केला. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगल व पोलीस पथक सहभागी झाले होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-17


Related Photos