भरमार बंदुकीने चितळाची शिकार, तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  एटापल्ली : 
तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर  अंतरावर  असलेल्या गेदा येथील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक केली. अहेरी न्यायालयाने शुक्रवारी तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले.
 २५ ते २७ फेब्रुवारी असे तीन दिवस गेदा गावात मोठा उत्सव ठेवुन नवीन हनुमान मंदिरात हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  २५ फेब्रुवारीपासून  पासून एक चितळ मंदिर परीसरात व गावात फिरत होते. मूर्तीची स्थापना झाल्याने सव्वा महिना मांस-मटन न खाण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे त्या चितळाची शिकार करण्यास गावकऱ्यांचा विरोध होता. परंतु २८ फेब्रुवारी रोजी मंदिर परीसरात फिरत असलेल्या चितळाला गावातील मुलाजी उलके मट्टामी (२८) या युवकाने भरमार बंदुकीने गोळी झाडून ठार केले. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. एटापल्लीचे वनपरिश्रेत्र अधिकारी संजूदास राठोड, वनपाल दुर्गेश तोगरवार, वनरक्षक पाटील यांनी गावात जावुन आरोपीच्या घरातून शिकार केलेल्या चितळाला ताब्यात घेतले. याशिवाय या कामात मदत करणाऱ्या बाबुराव राजू पुंगाटी (३२) आणि ईश्वर राजू पुंगाटी (२९) या दोन भावांनाही अटक केली.
वनविभागाने पंचनामा करून आणि पशुधन विकास अधिकारी डॉ.उमेश सोनटक्के यांनी शवपरिक्षण केल्यानंतर चितळाला सायंकाळी ७ वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. याप्रकरणी तीनही आरोपींना शुक्रवारी अहेरी न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-02


Related Photos