महत्वाच्या बातम्या

 गोवरी डीप खाणीत २३ हजारांची चोरी : आठवड्यानंतर तक्रार दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : डब्ल्यूसीएलच्या गोवरी डीप कोळसा खाणीत स्टोअर रूम फोडून सुमारे २३ हजार रुपये किमतीचे जुने वेल्डिंग साहित्य, लोखंडी पाने आणि पीजोमीटरचे मीटर चोरीला गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरीची घटना १० सप्टेंबरच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असताना तब्बल एक आठवड्यानंतर, १७ सप्टेंबर रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि चोरीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यास झालेला विलंब याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

ज्ञानेश्वर एकनाथ मोहितकर ५८ वर्ष, रा. रामपूर, शिवनगर वॉर्ड क्रमांक २, राजुरा हे गोवरी डीप खाणीत मागील नऊ महिन्यांपासून सुरक्षा इंचार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते ड्युटीवर पोहोचले असता डंपर-डोझर इंचार्ज उमेश अंधारे यांनी खाण परिसरातील स्टोअर रूममधून साहित्य चोरीला गेल्याची माहिती दिली.

खाणीत असलेल्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले जुने वापरातील वेल्डिंग साहित्य तसेच लोखंडी पाने असा अंदाजे ८ हजार रुपयांचा माल, तर बाजूच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेले जुने वापरातील पीजोमीटर मीटर अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे होते. असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर खाणीत काम करणारे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, चोरीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरीला गेलेल्या साहित्याचा परिसरात व इतरत्र शोध घेण्यात आला. मात्र माल मिळून आला नाही.

दरम्यान, १० सप्टेंबरच्या रात्री चोरी झाल्याचा संशय असताना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. चोरीनंतर तब्बल सात दिवसांनी तक्रार दाखल झाल्याने या विलंबामागील कारण काय, चोरीची माहिती तातडीने पोलिसांना का देण्यात आली नाही आणि या कालावधीत चोरीच्या घटनेशी संबंधित कोणते पुरावे उपलब्ध राहिले आहेत, याकडे तपासाचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार पुढील तपास करीत आहेत. चोरीच्या घटनेचा तपास करताना खाण परिसरातील सुरक्षा व्यवस्था, स्टोअर रूमची निगराणी तसेच चोरीच्या कालावधीतील हालचालींची माहिती तपासली जाण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos