महत्वाच्या बातम्या

 नागपूर येथे १० जूनपासून अग्निवीर भरती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया दुसऱ्यांदा नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल.


अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरां ना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील २५ टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची तरतूद योजनेमध्ये आहे. या अंतर्गत आता भरती प्रक्रियेसाठीची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी आता होणार आहे. त्या अंतर्गत १० ते १७ जूनदरम्यान ही भरती प्रक्रिया मानकापूर येथे होईल. नागपूर येथे होणाऱ्या भरती प्रक्रियेत नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील युवकांना सहभागी होता येणार आहे. या प्रक्रियेत बुलडाणा येथील उमेदवारांना सहभागी होता येणार नाही. भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लर्क, स्टोअरकीपर या पदांची पूर्तता होणार आहे. यासाठी आठवी ते दहावी उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.


- जिल्हानिहाय वेळापत्रक : 


१० जून : भंडारा, गडचिरोली
११ जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला (मूर्तीजापूर तालुका)
१२ जून : अकोला (मूर्तीजापूर वगळून सर्व तालुके), नागपूर

१३ जून : अमरावती, गोंदिया, वर्धा

१४ जून : सर्व जिल्हे

१५, १६, १७ जून : वैद्यकीय चाचणी





  Print






News - Nagpur




Related Photos