महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्रातील साहित्यिकांचा संदर्भकोष तयार करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : साहित्याची माहिती ऑनलाइन सहज प्राप्त होते. मात्र अनेक अनामिक साहित्यिकांबद्दल माहिती मिळत नाही. बरेचदा संदर्भही जुळत नाही. साहित्य क्षेत्रातील ही उणीव भरून काढण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांची धडपड सुरू आहे. संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर राज्यातील साहित्यिकांच्या संदर्भकोषाची निर्मिती ते करीत आहेत.

याबद्दल लोकमत ने संवाद साधला असता ते म्हणाले, यात बऱ्याच अडचणी आल्या. उपलब्ध असलेल्या विविध संदर्भग्रंथांची मदत झाली. यात मराठी वाङ्मय कोष, संक्षिप्त वाङ्मय कोष, वैदर्भीय सारस्वत, मराठवाडा सारस्वत: वास्तव लिखाण, विदर्भातील अक्षर तर्पण, ख्रिस्ती समाजाची ग्रंथसंपदा, लेवा समाजाचे साहित्यिक, नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक गोतावळा, मराठी प्राध्यापकांची सूची, प्रकाशन विश्व यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही माहिती अजूनही अद्ययावत होत आहे. किमान एक तरी पुस्तक प्रकाशित झालेल्या साहित्यिकांच्या संदर्भातील उपयुक्त माहिती यात संकलित केली जात आहे.

या कोषातील दिनविशेषांचे वाचन शालेय परिपाठात व्हावे, यासाठी ते शालेय शिक्षण मंत्री तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत.

राज्यातील साहित्यिकांचा संदर्भकोष लवकर मार्गी लावणे हाच आपल्या निवृत्तीपरांत आयुष्याचा अग्रक्रम आहे. समीक्षक व संशोधक डॉ. मदन कुलकर्णी यांच्या प्रेरणेने आपण यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आहे. - श्रीराम चव्हाण, सहसचिव, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ

यात काय असणार ?

कुठल्याही एका तारखेवरून साहित्यिकाची माहिती उपलब्ध करून देणारा ५ हजार साहित्यिकांची माहिती असणारा हा पहिलाच संदर्भ कोष असेल. कांदबरीकार, कथाकार, ललित लेखक, कवी अशा वेगवेगळ्या वर्गवारीतील साहित्यिक त्यातून सहज शोधता येतील. संशोधनाच्या क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक, साहित्यिक तसेच संस्थांना तो उपयोगी पडणार आहे.

पाच खंड निर्माण करणार

साधारणपणे १८५० पासूनचे संदर्भ या कोषात आहेत. याचे पाच खंड आणण्याचा श्रीराम चव्हाण यांचा प्रयत्न आहे. दोन ते तीन महिन्यांचा एक खंड असेल. चार वर्षातून एकदाच येणाऱ्या २९ फेब्रुवारी या तारखेला जन्मलेल्या साहित्यिकांची माहितीदेखील चव्हाण यांच्याकडे उपलब्ध आहे. एकट्या जून महिन्यात सर्वाधिक ६०० हून अधिक नोंदी आहेत. १ जानेवारी, १ जून आणि १ जुलै या तारखांना सर्वाधिक नोंदी आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos