महत्वाच्या बातम्या

 राज्यात प्रधानमंत्री कुसुम सौर कृषीपंप योजनेसाठी ऑनलाइन अर्जाचा पाऊस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री कुसुम सौर कृषीपंप योजनेसाठी राज्यात ऑनलाइन अर्जाचा पाऊस पडला. महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकारण्यासाठी १७ मे २०२३ पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पोर्टल सुरु होताच प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ १० दिवसात राज्यात २३ हजार ५८४ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. कृषी क्षेत्रात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

शेतकऱ्यांचे कृषीपंप सौर ऊर्जेद्वारे जोडण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा तसेच उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

एमएनआरई यांनी २२ जुलै २०१९ रोजी पीएम-कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या. तसेच २३ जानेवारी २०२१ रोजी एक लाख सौर कृषीपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील एक लाख सौर कृषीपंप, असे एकूण दाेन लाख सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली. राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात सदर योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लक्ष सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महाऊर्जा मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्विकरण्यासाठी १७ मे २०२३ पासून कुसुम योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टल सुरु केल्यानंतर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकाच वेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध नसल्यास, वाट पाहून कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा, असे आवाहन होत आहे.

या संकेतस्थळावर करा अर्ज

योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करु नये. प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध आहे.

पंपाची क्षमता (एचपी) पंपाची किंमत (जीएसटीसह) लाभार्थी हिस्सा (प्रवर्गनिहाय)

सर्वसाधारण (१० टक्के) अनुसूचित जाती (५ टक्के) अनुसूचित जमाती (५ टक्के)

३ एचपी - १९३८०३ - १९३८० - ९६९० - ९६९०

५ एचपी - २६९७४६ - २६९७५ - १३४८८ - १३४८८

७.५ एचपी - ३७४४०२ - ३७४४० - १८७२० - १८७२०





  Print






News - Bhandara




Related Photos