महत्वाच्या बातम्या

 ऑपरेशन नार्कोस अंतर्गत १० किलो गांजा जप्त : आरपीएफची विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : रेल्वेपोलिस दलकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत पथकाने पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये मिळून आलेल्या एका बॅगमधून १० किलो गांजा ताब्यात घेतला आहे. शनिवारी २० मे २०२३ दुपारी ०२:३९ वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

रेल्वेगाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची गर्दी वाढली असून याचाच फायदा घेत अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्यातूनच रेल्वे पोलिस दलाचे पथक रेल्वे स्थानक परिसर तसेच प्रवासी गाड्यांमध्ये निगराणी व तपासणी करून ऑपरेशन नार्कोस राबवत आहेत. अशात गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शनिवारी २० मे २०२३ दुपारी ०२:३९ वाजतादरम्यान रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक-३ वर आलेल्या पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस (१२८४३) मधील एस-६ डब्यात तपासणी करून सीट क्रमांक-५८ च्या खाली बेवारस स्थितीत पडून असलेला एक लाल रंगाचा ट्रॉली बॅग जप्त केला.

पथकाने त्या डब्यात बसलेल्या प्रवाशांना बॅगबद्दल विचारपूस केली असता कुणीही बॅगच्या मालकाबद्दल काहीच सांगू शकले नाही. पथकाने बॅग उघडून बघितले असता त्यात खाकी रंगांच्या नऊ लहान पाकिटांत गांजा भरून असल्याचे दिसले. यावर पथकाने बॅग व पाकीट रेल्वे पोलिस बलच्या कार्यालयात आणले व अधिकारी आणि पंचांसमक्ष मोजणी केली. त्यात १० किलो गांजा आढळला असून त्याची किंमत लाखो रूपयांत आहे. त्यातील काही नमूने काढून उर्वरित गांजा अपर तहसीलदार प्रकाश तिवारी यांच्या समक्ष सील केले. प्रकरणी एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे पोलिस दलचे उपनिरीक्षक सी.के.पी.टेम्भूर्णिकर, प्रधान आरक्षक राजेंद्र रायकवार व सहकाऱ्यांनी केली.





  Print






News - Gondia




Related Photos