‘मुक्तीपथ’ पथदर्शी व्याप्ती चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई  :
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी व तंबाखूमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुक्तीपथ’ या पथदर्शी प्रकल्पास दोन वर्षांची मुदतवाढ देतानाच अतिरिक्त चार कोटी रुपयांचा निधी तसेच या प्रकल्पाची व्याप्ती चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात वाढविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली.
तंबाखू व दारुमुक्तीच्या दिशेने गडचिरोली जिल्हा यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्च संस्था, राज्य शासन, टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मुक्तीपथ प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या यशस्वीतेबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते यावेळी म्हणाले, समाजातील युवा पिढीवर दारु आणि तंबाखूमुळे विपरित परिणाम होत आहे. तो रोखण्यासाठी मुक्तीपथ सारखे प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ अंतर्गत गुटखा जप्तीसंदर्भात कारवाई केल्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून रासायनिक विश्लेषणाचा अहवाल तीन महिन्यात दिला गेला पाहिजे. त्यात विलंब होता कामा नये. नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेची शाखा गडचिरोली येथे सुरु करण्याबाबत कार्यवाही करावी. दारु आणि गुटख्याचे जे मोठे पुरवठादार आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दारु आणि तंबाखूमुक्तीच्या या यशस्वी पॅटर्नची व्याप्ती चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातही वाढवावी, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला दोन वर्ष मुदतवाढ दिली.
या प्रकल्पाबाबत सादरीकरण करताना डॉ. अभय बंग यांनी सांगितले, मृत्यू, रोग, अपंगत्व या कारणांसाठी जी सर्वोच्च दहा कारणे आहेत, त्यामध्ये दारु आणि तंबाखूचा समावेश होतो. समाजावर या दोन घटकांचा होणारा विपरित परिणाम लक्षात घेता, हा पथदर्शी प्रयोग राबविण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दोन वर्षांत गडचिरोली जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये दारु पिण्याचे प्रमाण 41 टक्के तर तंबाखू सेवनाचे प्रमाण 44 टक्क्याचे आढळून आले.
एकात्मिक आणि बहुविध उपायांनी तीन वर्षांत या दोन्ही घटकांचे सेवनाचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबविला गेला. मुक्तीपथ प्रकल्पाच्या चमूने शासनाच्या विविध यंत्रणांना मदत करीत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 100 गावांमध्ये तर 1 हजार 200 शाळांमध्ये जाणीव जागृती केली. या सर्व मोहिमेचा सकारात्मक परिणाम जाणवला असून 583 गावांमध्ये दारुविक्री आणि सेवन बंद झाले आहे. तर 275 गावांत तंबाखू विक्री बंद झाली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 48 हजार पुरुषांनी दारु पिणे बंद केले असून 97 हजार 644 लोकांनी तंबाखू खाणे सोडले आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू सेवन कमी होण्याच्या प्रमाणाला गती मिळाली आहे. देशात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदिप व्यास, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, डॉ. आनंद बंग, गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आदी उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-22


Related Photos