नक्षल्यांनी ठार केलेल्या निष्पापांसाठी विविध पक्षांचे राजकारणी पुढे येणार काय?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात होऊ घातलेल्या विकासाच्या कामात एका अपघातामुळे अडथळा आणण्यासाठी पुढाकार घेवून आंदोलन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी जिल्ह्याबाहेरूनही आले होते. यामुळे आज २२ जानेवारी रोजी भामरागड तालुक्यात झालेल्या तीन निष्पाप आदिवासींच्या हत्येचा विरोध करण्यासाठी पुढाकार घेतील काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
१६ जानेवारी रोजी एटापल्ली - आलापल्ली मार्गावर ट्रक आणि बसचा अपघात झाला होता. या अपघातात बसमधील चार जण ठार झाले होते. चार जणांचा मृत्यू होणे  अत्यंत दुःखद आहे. मात्र या घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडून आल्या. सुरजागड येथून लोहखनीज वाहून नेण्यासाठी जात असलेली तब्बल १५ वाहने पेटवून देण्यात आली. तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी करीत रास्ता रोको केला. काही नेत्यांनी थेट सुरजागड येथील उत्खनन बंद करून प्रकल्पच बंद करण्याची मागणी केली. उद्योग निर्मितीला विरोध करणारे हे नेते आता भामरागडमध्ये झालेल्या या हत्त्येच्या निषेधार्थ का पुढे येत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अपघातानंरच्या परिस्थितीमुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनाही घटनास्थळी जावे लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध आश्वासने, लेखी पत्रे द्यावी लागली होती. मात्र हिच परिस्थिती जिल्ह्यात घडलेल्या नक्षल घटनांच्या बाबतीत दिसून येत नाही.   २२ एप्रिल २०१८ रोजी नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत तब्बल ४० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. यावेळी विविध राज्यांतील प्रतिनिधी असलेली सत्यशोधन समिती जिल्ह्यात दाखल झाली होती. यावेळीही नक्षल्यांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न या समितीने केला होता. मात्र नक्षल्यांनी घडवून आणलेल्या उत्पाताबाबत या समित्या कधीही समोर आल्या नाहीत. तसेच आता स्थानिक राजकीय पदाधिकारी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहेत. अपघातामुळे विकासाला विरोध करण्याची भूमिका काही राजकीय पक्ष घेत असल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचाच हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. एका अपघातामुळे जिल्ह्यात होवू घातलेला प्रकल्पच रद्द करण्यात यावा, ही मागणी करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न सामान्यांच्या मनात येवू लागला आहे. आता आजच्या भामरागड येथील घटनेवर कोण काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-22


Related Photos