महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांना २६३ कोटींचे कर्ज वाटप


-  मागील वर्षाच्या तुलनेत ६६ कोटींची वाढ

-  १० हजार ८४० गटांना कर्ज वाटपाचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 840 बचतगटांना उद्योजकता विकास करण्याकरिता बँक लिंकेजच्या माध्यमातून 263 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 66 कोटींनी अधिक कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत वर्धा हा महाराष्ट्रातील अग्रणी जिल्हा आहे. जिल्ह्यात एकूण 14 हजार 309 स्वयंसहायता गट असून 950 ग्राम संघ व 49 प्रभाग संघ स्थापन करण्यात आलेले आहेत. उमेद अंतर्गत महिलांना विविध उपजीविकेचे साधन तयार करून देऊन त्यांना सक्षम करण्यात येत आहे. सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून आर्थिक समावेशनाला चालना देण्याकरिता स्वयंसहायता गटांना बँकांशी जोडणे जाते.

जिल्ह्यातील गटांना मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता उमेदच्या माध्यमातून विविध प्रयत्न होत असतात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 9 हजार 300 गटांना 195 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने विविध बँकांद्वारे उद्दिष्टांपेक्षाही पुढे जात 10 हजार 840 स्वयंसहायता बचतगटांना 263 कोटी 37 लक्ष रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे व जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन प्रकाश पोलकडे यांच्या प्रयत्नातून अग्रणी बॅंक प्रबंधक वैभव लहाने यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आला.

बँक लिंकेज सर्वाधिक व्हावे व जास्तीत जास्त बचतगटांना याचा लाभ मिळावा, याकरिता जिल्हास्तरावर योग्य नियोजन करून बँकांना उद्दिष्ट देण्यात आले. त्याचसोबत जिल्हा व तालुका स्तरावर बँकर्सच्या कार्यशाळा व बँक मेळावे आयोजित करण्यात आले होते. बँकेद्वारे गरिबातील गरीब कुटुंबीयांपर्यंत बँकेच्या आर्थिक सेवा पोहोचविणे व स्वयंसहायता बचत गटातील महिला सदस्यांची आर्थिक साक्षरता वाढविण्याकरिता बँक अधिकारी व उमेद प्रकल्पांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी, व्यवस्थापक, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता बचतगटांची कर्ज मर्यादा ही 3 ते 10 लाखापर्यंत आहे. सद्या स्थितीत प्रथम बँक लिंकेज करणाऱ्या बचतगटांना 3 लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा आहे व पाचव्या किंवा सहाव्या वेळेस बँक लिंकेज करणाऱ्या स्वयंसहायता बचतगटांना 10 लाख पर्यंतची कर्ज मर्यादा देण्यात आलेली आहे. बँकनिहाय बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्वाधिक कर्ज प्रकरणे मंजूर केलेली आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे कर्ज प्रकरणे मंजूर केलेले आहेत.

या कर्जामुळे महिलांना आवश्यक असणाऱ्या बाबी ज्यामध्ये शेती शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, खाद्यपदार्थ उद्योजक करता येईल. कर्ज वितरणाच्यावेळी आर्थिक साक्षरता कार्यशाळा घेतल्याने महिलांचे आर्थिक ज्ञान वाढण्यास मदत झाली. यामुळे उपजीविका वर्ष साजरे करण्याकरिता आणि महिलांची व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचाविण्याकरिता व गरिबातील गरीब कुटुंबाना याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात या कर्जवाटपात सरकारी बँकांचे योगदान अधिक आहे. खाजगी बँकांनी देखील चांगले कर्जवाटप करून यावर्षी शंभर कोटीने वाटप वाढविण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केला.





  Print






News - Wardha




Related Photos