महत्वाच्या बातम्या

 युवा मंथन विज्ञान प्रदर्शनात बल्लारपूर पब्लिक स्कूलला तृतीय क्रमांक


- बायोकॉफ्टर विज्ञान मॉडेलला २१ हजार रुपयांचे पारितोषिक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपूर येथील व्हीएनआयटी (VNIT) येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा मंथन ओपन सायन्स एक्झिबिशन मध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या विज्ञान प्रदर्शनात शाळेचे इयत्ता दहावीतील विद्यार्थी सोहम मुरकुडे व यश मल्लेवार यांनी बायोकॉफ्टर हे नाविन्यपूर्ण विज्ञान मॉडेल सादर केले. या प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण व स्पष्टीकरण पियुष परसुटकर या विद्यार्थ्याने केले. हा प्रकल्प शिक्षक मिकीन कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला.

प्रदर्शनात प्रकल्पाची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन व प्रभावी मांडणी यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षकांचे लक्ष वेधून घेत तृतीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना २१ हजार रुपये रोख पारितोषिक व पुरस्कार प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला मिळालेले हे यश शाळेसाठी अभिमानास्पद ठरले आहे.

या यशाचे विशेष श्रेय नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणारे मार्गदर्शक शिक्षक मिकीन कामटे तसेच विद्यार्थ्यांची मेहनत, कल्पकता आणि चिकाटी यांना जाते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष संजय वासाडे, व्यवस्थापक प्रा. डॉ. मेघा शुक्ला आणि मुख्याध्यापिका सौ. ज्योत्स्ना बाबुलकर यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos