महत्वाच्या बातम्या

 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा लाखो विद्यार्थ्यांना फटका : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पुढील परीक्षा स्थगित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका राज्यातील लाखो विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे.

सध्या विद्यापीठांत हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सुरू असून राज्यातील तब्बल 40 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठासह सर्व विद्यापीठांच्या पुढील परीक्षा स्थगित करण्याची नामुष्की विद्यापीठांच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर ओढवली आहे.

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने गुरुवार 2 फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 1 फेब्रुवारीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत ठोस निर्णय न घेता आंदोलनकर्त्यांची केवळ आश्वासनावरच बोळवण केल्याने परीक्षांचे काम न करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. या निर्णयाची झळ आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसली. 2 फेब्रुवारी रोजी परीक्षा कशाबशा पार पडल्या. मात्र आजची परिस्थिती पाहून अनेक विद्यापीठांनी उद्या 3 फेब्रुवारीपासून होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या 3 फेब्रुवारीपासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने पुढील सर्व परीक्षा स्थगित करत असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे. तसेच गुरुवारी सकाळ सत्रातील एमए सत्र 4, एमए हिंदू स्टडीज, दुपारी सत्रातील एमएस्सी सत्र 4, एमकॉम सत्र 2 (सिबीजीस), एमकॉम सत्र 2 (चॉईसबेस), एलएलबी सत्र 3, एलएलबी / बीएलएस सत्र 3 (5 वर्षीय ), एमकॉम भाग 1 (वार्षिक), बी.व्होक. हेल्थ केअर सत्र 5, बी.व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम सत्र 5 या परीक्षा सुरळीत पार पडल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.


या विद्यापीठांना संपाची झळ

मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, गोंडवाना विद्यापीठ, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, स्वामी रामनंदतीर्थ नांदेड विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.


राज्य सरकारवर विश्वास नाही

आतापर्यंत राज्य सरकारने आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी केवळ आश्वासनेच दिली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आम्हाला आश्वासनांचे गाजर दाखविले जाते. मात्र परीक्षा संपल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता करण्याचा विसर पडतो. मात्र यंदा आम्ही फसणार नाही. आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय येईलपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. सरकारला 20 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. तोवर निर्णय न घेतल्यास विद्यापीठ, महाविद्यालये बेमुदत बंद करण्याचा इशारा आम्ही दिला आहे.

अजय देशमुख, प्रमुख संघटक, राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती





  Print






News - Rajy




Related Photos