महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरच्या शिक्षिका सरिता रामटेके यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार


- २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेसह शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय योगदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी बल्लारपूर पंचायत समितीअंतर्गत जि. प. शाळा, बामणी काटवली येथील शिक्षिका सरिता पुसाजी रामटेके यांची निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्हा निवड समितीने घेतली आहे.

सरिता रामटेके यांचा एकूण २८ वर्षांचा शिक्षक सेवाकाळ असून त्या बामणी काटवली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. यापूर्वी त्यांना प्राथमिक तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

त्यांच्या कार्याची विशेष बाब म्हणजे बल्लारपूर तालुक्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांना निपुण करण्याची कामगिरी त्यांच्या शाळेने केल्याचा उल्लेख पुरस्कार प्रस्तावात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता विकसित करण्यासोबतच त्यांना शाळेच्या शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीही रामटेके यांनी विशेष प्रयत्न केले. कॉन्व्हेंटमधून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याचे नमूद आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शैक्षणिक गुणवत्ता, नियमित अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांवर भर देणाऱ्या सरिता रामटेके यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बल्लारपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून गटविकास अधिकारी धनंजय साळवे, गट शिक्षणाधिकारी सचिन मळवी, शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील १५ शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नियोजन भवन येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरिता रामटेके यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.
  





  Print






Related Photos