महत्वाच्या बातम्या

 स्कूल व्हॅन कारवर आदळली, अनर्थ टळला तुमसरात काही तासांत दोन अपघात : हायड्रा उलटून ऑपरेटर जखमी, काटेबाम्हणीत दुचाकी अपघातात चौघे जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भांडार : तुमसर शहरात मंगळवारी ४ सकाळच्या सुमारास काही तासांच्या अंतराने दोन अपघाताच्या घटना घडल्या. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मोठी जीवितहानी टळली. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन कारवर आदळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर रेल्वेच्या कामादरम्यान हायड्रा उलटल्याने ऑपरेटर जखमी झाला. पहिली घटना सकाळी साडेआठच्या सुमारास गणेश लॉन परिसरात घडली. यूएसए शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन एका कारवर जाऊन आदळली.

व्हॅनमध्ये लहान विद्यार्थी असल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळविल्याने विद्यार्थ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातात कारचे नुकसान झाले असून मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास हनुमान तलाव परिसरात रेल्वेच्या सुरू असलेल्या कामादरम्यान हायड्रा अचानक उलटली. या अपघातात हायड्राचा ऑपरेटर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, सोमवारी ३ रात्री तुमसर–रामटेक राज्य मार्गावरील मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी परिसरातील धोकादायक वळणावर आणखी एक अपघात घडला. एमएच-३५ एझेड-०८२४ क्रमांकाच्या दुचाकीवरून एक कुटुंब तुमसरहून नागपूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात दोन महिला, एक बालिका आणि एक युवक जखमी झाले. जखमी कुटुंब तिरोडा तालुक्यातील वडेगाव-सातोना येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर आतिक टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत करून उपचारासाठी रवाना केले.

काही तासांच्या अंतराने घडलेल्या या सलग अपघातांमुळे तुमसर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शालेय वाहनांच्या सुरक्षिततेसह सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos