लसीकरणासाठी पिंपरी महानगरपालिकेचा मेगा प्लॅनविदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पिंपरी :
पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. शहरातील पालिकेच्या रुग्णालयांमधील बेड फूल्ल झाले आहेत. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात आज (सोमवारी) 1 लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील 25 हजार नागरिकांना लस देण्याचे उदिष्ट ठेवले आहे. यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. नागरिकांना लसीकरण केंद्रामध्ये पोहचण्यासाठी बसची सोय पालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंतची करोनाबाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या जवळ येऊन पोहचली आहे. तर शहरामध्ये तब्बल 20 हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. मृत्यू पावणाऱ्या नागरिकांमध्ये 45 वर्षांवरील नागरिकांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील 45 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येत आहे. जे नागरिक एकापेक्षा अधिक जणांच्या संपर्कात येतात व ज्यांचे वय 45 पेक्षा अधिक आहे अशा नागरिकांना प्राधान्यांने लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्षक, भाजी विक्रेते, दुकानदार, मॉलमध्ये काम करणारे, मंडईतील भाजी विक्रेते, सुरक्षा रक्षक, ड्राइव्हर, छोटे टपरी चालक हे एकापेक्षा अधिक जणांच्या संपर्कात येत असतात.
तसेच शहरातील झोपडपट्यांमध्ये नागरिक अतिशय जवळ-जवळ राहत असतात. त्याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे कठीण होते. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या व 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टीपासून ते लसीकरण केंद्रापर्यंत नागरिकांना ने-आण करण्यासाठी बसची सोय करण्यात आली आहे. 25 हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहरातील सर्व लसीकरण केंद्रे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
करोनाला हरविण्यासाठी नियमाचे पालन करणे आवश्‍यक आहे. त्यासोबतच लस हा एक चांगला पर्याय आपल्याला उपलब्ध झाला आहे. करोनाची लस सुरक्षित असल्याने ती सर्व नागरिकांनी घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शहरातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी पालिकेच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यायची आहे. तसेच सोमवारी आपल्याला 25 हजार नागरिकांना लस देण्याचे उदिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला सहकार्य करत सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-04-04


Related Photos