महत्वाच्या बातम्या

 शुद्धीकरण यंत्रणा असूनही नळांना अशुद्ध पाणी


 - लखमापूर बोरीतील नागरिकांचा संताप : जल जीवन मिशनच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत उभारण्यात आलेली पाणी शुद्धीकरण यंत्रणा लखमापूर बोरी येथे असूनही नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही यंत्रणा सध्या निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच गावातील अनेक घरांमध्ये गढूळ, गाळयुक्त आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे अस्वच्छ पाणी प्यायचे की फेकून द्यायचे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गावात अद्ययावत पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नळातून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक भागांमध्ये नळांना रंग बदललेले व गाळयुक्त पाणी येत असून, पाणीपुरवठाही नियमित होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढतो. कॉलरा, अतिसार, कावीळ यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लाखो रुपये खर्च, मात्र समस्या कायम -

नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारली. मात्र, या यंत्रणेचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनेनंतरही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही पाणीपुरवठा योजना नेमकी कोणत्या कारणामुळे अपयशी ठरत आहे, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोष दूर करून गावात नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या समस्यांमुळेही परिणाम -

पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल व संचालनासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमित मानधन मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे योजनेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

योजनेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून केवळ ५० टक्के वेतन मिळत आहे आणि तेही वेळेवर मिळत नाही. टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचतो, मात्र साफसफाईसाठी मदतनीस उपलब्ध नाही. पाणी शुद्धीकरण करणारी डोजिंग मशीनही बिघडलेली आहे.

गावाची लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा योजनेसाठी किमान दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना संपूर्ण जबाबदारी एकट्या कर्मचाऱ्यावर असल्याने शुद्धीकरण प्रक्रियेवर थेट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तातडीने दखल घेण्याची मागणी - 

लखमापूर बोरी येथील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाणी शुद्धीकरण यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, बंद पडलेल्या यंत्रणा सुरू कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos