महत्वाच्या बातम्या

 गांजा विक्रीच्या अड्ड्यावर रामनगर पोलिसांचा छापा : १६ किलो गांजा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या यासीर अली उर्फ सैय्यद परवेज सैय्यद गणी (वय ३५), रा. बगड खिडकी, मदरसा जवळ, चंद्रपूर याला रामनगर पोलिसांनी धाडसी कारवाईत अटक केली. आरोपीच्या राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात १६.०२५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व इतर साहित्यांसह एकूण १ लाख ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग समोर आला असून तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस हवालदार आनंद खरात व पोलीस हवालदार संतोष जोरगेलवार हे दैनंदिन कामकाजात असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, यासीर अली उर्फ सैय्यद परवेज सैय्यद गणी हा आपल्या राहत्या घरातून गांजाची विक्री करीत आहे. माहितीची दैनंदिनीत नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला.

झडतीदरम्यान पोलिसांना घरातून १५.८६० किलो गांजा, किलो मॅक्स कंपनीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दोन प्रवासी बॅगा तसेच गांजाचे पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आठ चिकट पट्ट्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६० हजार १०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत आरोपीने हा गांजा त्याचा साला जुबेर करीम खान याने आणून दिल्याचे तसेच कालू रा. बगड खिडकी, चंद्रपूर याने तो घरात ठेवण्यासाठी मदत केल्याची माहिती दिली. त्यानंतर या दोघांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९८०/२०२६ अन्वये कलम ८(क), २०(ब) व २९ एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेषण पथकातील सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे, पोहवा प्रकाश बलकी, बाबा नैताम, मपोहवा मनीषा मोरे, पोहवा रामप्रसाद नैताम, आंनद खरात, रवीकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, पोअं प्रकाश मडावी, संदिप गेडाम, पंकज ठोबरे, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके, देविदास राठोड तसेच मपोअं ब्ल्युटी साखरे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos