महत्वाच्या बातम्या

 भामरागड तालुक्याची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न : शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : भामरागड तालुक्याची पहिली शिक्षण परिषद मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत गट साधन केंद्र, भामरागड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापनांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सकाळची शाळा नियमितपणे घेऊन परिषदेस वेळेत उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदुदास रामटेके (केंद्रप्रमुख) यांनी केले, तर सूत्रसंचालन विनीत पद्मावार यांनी केले. चालू शैक्षणिक सत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक बाबुलाल शेडमाके आणि पंकज मेगरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी गटविकास अधिकारी वाढई यांनी परिषदेला भेट देऊन मार्गदर्शन केले. आगामी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अनुषंगाने निवासी मार्गदर्शन सत्रांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी अधिक नियोजनबद्ध व परिणामकारक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमोद मुळे (केंद्रप्रमुख) यांनी पूर्वचाचणीविषयी मार्गदर्शन केले. कालीदास कुनघाडकर (विस्तार साधन व्यक्ती) यांनी शाळापूर्व तयारी, विद्याप्रवेश मार्गदर्शन, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाच्या विश्लेषण व कृती कार्यक्रमाचा आढावा सादर केला.

जितेंद्र कोहळे (केंद्रप्रमुख) यांनी डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची नोंदणी व अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. गजानन राठोड (केंद्रप्रमुख) यांनी विद्यांजली पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेचे मार्गदर्शन केले.

विनीत पद्मावार (प्राथमिक शिक्षक) यांनी PAT एप्रिल २०२६ चे विश्लेषण, कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी व पुढील पूर्वतयारी यावर मार्गदर्शन केले. गुरुदास नगरधने (प्राथमिक शिक्षक) यांनी PARAKH सर्वेक्षण २०२७ चे नियोजन व आराखडा सादर केला. दिनेश गायधने (विशेष शिक्षक) यांनी PGI विश्लेषण, पूर्वतयारी, कृती कार्यक्रम व आराखड्यावर सविस्तर माहिती दिली.

सुभाष अन्नदेलवार (विस्तार साधन व्यक्ती) यांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेच्या कृती कार्यक्रम व नियोजनावर मार्गदर्शन केले. तर निखील कुमरे (गट शिक्षण अधिकारी) यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आवश्यक आराखडा, विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा केली.

परिषदेच्या शेवटी सर्व सुलभकांनी त्यांना नेमून दिलेल्या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. संपूर्ण परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता, नियोजन, मूल्यमापन, विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच आगामी शैक्षणिक उद्दिष्टे यांवर सखोल चर्चा झाली.

गटविकास अधिकारी वाढई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि गट शिक्षण अधिकारी निखील कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भामरागड तालुक्याची पहिली शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. परिषदेमुळे शिक्षकांना नव्या शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन, गुणवत्तावाढीच्या दिशा आणि आगामी शैक्षणिक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos