बारफोडी करणाऱ्या टोळीचा ब्रम्हपुरी पोलीसांनी केले पर्दाफाश : चार आरोपी अटकेत; १९ लाख ४ हजार मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बारमध्ये शटर वाकवून विदेशी दारूची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सौरभ अनिल वाघाडे (वय २६), रा. बामणी, ता. नागभीड, जगदीश दीपक शेंद्रे (वय २५), रा. नागभीड, अभिषेक अशोक अलोने (वय २६), रा. कुनघाडाचक, ता. नागभीड आणि विशाल दिवाकर ठाकरे (वय २३), रा. मांगली अरब, ता. नागभीड या चार आरोपींना अटक केली आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेली विदेशी दारू, इतर साहित्य तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो, मारुती बलेनो आणि मारुती एस-प्रेसो ही तीन वाहने असा एकूण १९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले बारफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी फिर्यादी शंतनू प्रकाशराव बगमारे, रा. विद्यानगर, ब्रम्हपुरी यांनी मौजा अड्याळ येथील त्यांच्या बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून प्रवेश करून विदेशी दारू व इतर साहित्य असा १ लाख ६६ हजार ८०५ रुपयांचा माल चोरी केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान बारमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपींनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच अवघ्या आठ दिवसांत आरोपींनी पुन्हा ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील अमित दादाजी बनकर यांच्या बारचे मागील शटर वाकवून आत प्रवेश केला व विदेशी दारू तसेच इतर साहित्य असा २ लाख १३ हजार २२७ रुपयांचा माल चोरी करून पोबारा केला. सलग घडलेल्या या दोन घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने दोन स्वतंत्र तपास पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन्ही बारफोडीच्या घटना एकाच टोळीने केल्याचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली विदेशी दारू, इतर साहित्य तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-२१-एआर-१८४४ क्रमांकाची बोलेरो, एमएच-३३-एडी-११११ क्रमांकाची मारुती बलेनो आणि एमएच-३४-व्हीवाय-५४८७ क्रमांकाची मारुती एस-प्रेसो कार जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांचा नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ठ रंगारी यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




