पेपरमील न्यू कॉलनीत तरुणावर हल्ला : मित्राला चावीने मारून जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जुन्या वादातून पेपरमील न्यू कॉलनी येथील चक्की ग्राउंड परिसरात एका तरुणाला बोलावून त्याच्यावर मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी २ ऑगस्ट रात्री घडली. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रालाही चावीने मारून जखमी करण्यात आले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अयान इकबाल शेख २० वर्षे रा. शिवनगर वार्ड, बल्लारपूर याचा आरोपी सुफीयान शेख याच्याशी सुमारे आठवडाभरापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रविवारी रात्री सुमारे ८ वाजता सुफीयान शेख याने अयानला फोन करून पेपरमील न्यू कॉलनीतील चक्की ग्राउंड येथे बोलावले.
अयान हा त्याचा मित्र शाहीद खान याच्यासह घटनास्थळी पोहोचला असता तेथे सुफीयान शेख, राहुल उर्फ काल्या आणि प्रणय कुक्का हे उपस्थित होते. तक्रारीनुसार, तिघांनी अयानला अश्लील शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर सुफीयान शेख याने अयानच्या गालावर थप्पड मारून जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या शाहीद खान याच्या ओठावर प्रणय कुक्का याने हातातील चावीने वार केल्याने तो जखमी झाला. दरम्यान, अयानने इतर मित्रांना मदतीसाठी बोलावले असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर अयान शेख याने जखमी मित्रासह बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सुफीयान शेख, राहुल उर्फ काल्या आणि प्रणय कुक्का यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ११५(२), २९६, ३(५), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




