वाकडी येथील निवासी नवबौद्ध शाळेची आजाद समाज पार्टीकडून पाहणी : शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न आणि प्रशासनाच्या नियोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा सचिव सुरेंद्र वासनिक आणि युवा कार्यकर्ता सुरज पिपरे यांनी आज समाजकल्याण विभागाच्या निवासी नवबौद्ध शाळा, वाकडी येथे भेट देऊन शाळा व वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
भेटीदरम्यान अनेक पालकांनी तक्रार केली की, शाळेत दीर्घकाळ केवळ तीन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन होत नव्हते. परिणामी काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडून घरी परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पालकांनी सांगितले.
यासंदर्भात मुख्याध्यापकांशी चर्चा केली असता, अवघ्या चार दिवसांपूर्वी पाच कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, यावर आजाद समाज पार्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करत, शाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती करण्यामागे प्रशासनाचे नियोजन नेमके कुठे आहे? असा सवाल केला.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली, आवश्यक शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षकच वेळेवर उपलब्ध नसतील, तर अशा खर्चाचा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होणार?
याशिवाय इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाची स्थितीही चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना जंगलातून सुमारे ७०० मीटर पायी चालत महामार्गावर यावे लागते आणि त्यानंतर शाळेत पोहोचण्यासाठी आणखी ७ ते ८ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. सुरक्षित व नियमित वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, २०१३ मध्ये सुरू झालेल्या या शाळेच्या प्रवेशद्वारावर किंवा मुख्य रस्त्यावर आजतागायत शाळेचे नाव दर्शविणारा फलकही लावण्यात आलेला नाही. तसेच शाळेचे नाव नवेगावच्या नावाने असताना ती वाकडीजवळ जंगल परिसरात सुरू करण्यात आल्याने यामागील प्रशासकीय निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आजाद समाज पार्टीने स्पष्ट केले की, केवळ भव्य इमारती उभारून शिक्षण व्यवस्था सक्षम होत नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वेळेवर शिक्षकांची नियुक्ती, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि प्रभावी प्रशासन ही तितकीच आवश्यक बाब आहे.
या पाहणीदरम्यान आढळलेल्या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, संबंधित प्रश्नांबाबत सखोल पाठपुरावा करून जबाबदार अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे पक्षाने सांगितले.
News - Gadchiroli




Petrol Price




